लोकवाहिनी न्यूज
नागपूर : जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कांदा निर्यातीसंदर्भात काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी नागपूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना कांदा उत्पादक शेतकरी, महायुतीतील बंडखोरी, लाडकी बहीण योजना आणि विविध समकालीन विषयांवर भूमिका स्पष्ट केली. कांदा व्यापाऱ्यांच्या आणि कांदा उत्पादकांच्या प्रश्नाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे निर्यातीसंदर्भात काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, हीच सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
महायुतीमधील काही इच्छुकांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, महायुतीतील कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी अर्ज भरले असतील तर त्यांना समजावून सांगत माघार घेण्यास प्रवृत्त केले जाईल.
अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले की, समन्वय समितीच्या बैठकीत कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करण्यापूर्वी संबंधित नेत्यांची परवानगी घेण्याचे ठरले होते. त्यांनी परवानगी घेतली होती की नाही, याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच विचारावे लागेल.
महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, एखाद्याची बदली त्याच्या इच्छेनुसार झाली नाही तर अनेकदा अशा प्रकारचे आरोप केले जातात. काँग्रेसचे नागपुरातील उमेदवारांबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया देत, निवडणुकीच्या निकालानंतर सर्व काही स्पष्ट होणार असल्याचे सांगितले.
लाडकी बहिणी योजना राजकीय फायद्यासाठी नाही
लाडकी बहीण योजनेबाबत करण्यात आलेल्या टीकेवर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, ही योजना कोणत्याही राजकीय फायद्यासाठी राबविण्यात आलेली नाही. काही लाभार्थ्यांची नावे यादीतून कमी झाली असतील, तर त्याची पुन्हा तपासणी करून आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या जाऊ शकतात. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवणे हाच सरकारचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









