लोकवाहिनी न्यूज
बीड : नीट पेपरफुटी प्रकरणातील तपासाला गती मिळाल्यानंतर, सीबीआयच्या कारवाईत बीड शहरातील कथित सूत्रधार पी.व्ही. कुलकर्णी यांच्या नावाशी संबंधित शाहू नगर परिसरातील ४ मजली अनधिकृत बांधकामावर नगरपालिकेने पाडकामाची कारवाई सुरू केल्याने या प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळे वळण मिळाले आहे.
पेपरफुटी प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधारांपैकी एक म्हणून समोर आलेले सेवानिवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांचे बीडमधील शाहू नगर परिसरत सुरू असलेले ४ मजली बांधकाम आता पाडले जात आहे. नगरपालिकेकडून यापूर्वी संबंधित बांधकामाबाबत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत आवश्यक परवानग्या सादर न झाल्याने प्रशासनाने अखेर कारवाईचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, ही कारवाई संबंधित ठेकेदाराकडूनच सुरू असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सीबीआयने या प्रकरणात महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, लातूर आणि बीडसह विविध ठिकाणी धडक कारवाया करत अनेकांना अटक केली आहे. तपास यंत्रणेकडून सुरू असलेल्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून या संपूर्ण रॅकेटचा व्याप मोठा असल्याचे संशय व्यक्त केला जात आहे.
सीबीआयने लातूरमधील आरसीसी क्लासेसचे प्रा. शिवराज मोटेगावकर आणि प्रा. पी.व्ही. कुलकर्णी यांना अटक करून त्यांना न्यायालयाने १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या दोघांवर पेपरफुटीच्या माध्यमातून मोठ्या आर्थिक व्यवहारांचा आणि विद्यार्थ्यांना अनियमित पद्धतीने प्रवेश प्रक्रियेत मदत केल्याचा आरोप आहे. तपासात असेही समोर आले आहे की, लातूरमधील एका खाजगी वैद्यकीय व्यक्तीच्या फ्लॅटमध्ये संबंधितांकडून कोचिंग व मार्गदर्शन सत्रे घेतली जात होती.









