लोकवाहिनी न्यूज
नवी दिल्ली : भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) रूडकीने आज संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) ॲडव्हान्स्ड-२०२६ चा निकाल जाहीर केला. यंदा दिल्ली झोनच्या शुभम कुमारने ३६० पैकी ३३० गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला. दुसऱ्या स्थानावर दिल्ली झोनचाच कबीर चिल्लर राहिला. त्याने ३२९ गुण मिळवले, तर जतिन चाहरने ३१९ गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला. अशा प्रकारे अव्वल तीनही स्थानांवर दिल्ली झोनच्या उमेदवारांचे वर्चस्व राहिले.
आयआयटी रूडकीने निर्धारित वेळेपूर्वी निकाल जाहीर करत अंतिम उत्तरसूचीही प्रसिद्ध केली. उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर रोल क्रमांक, जन्मतारीख आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाच्या साहाय्याने निकाल पाहता येणार आहे. यावर्षी जेईई ॲडव्हान्स्डसाठी १,८७,३८९ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १,७९,६९४ उमेदवार परीक्षेला बसले आणि ५६,८८० उमेदवार यशस्वी घोषित करण्यात आले. यशस्वी उमेदवार आता भारतीय तंत्रज्ञां संस्थांमधील प्रवेशासाठी संयुक्त सीट वाटप प्रक्रिया (जोसा) समुपदेशनात सहभागी होऊ शकतील. यशस्वी उमेदवारांमध्ये १०,१०७ विद्यार्थिनींचाही समावेश आहे.
यंदा सर्वसाधारण प्रवर्गाची कट-ऑफ ९२ गुणांवर पोहोचली असून ती गेल्या वर्षाच्या तुलनेत १८ गुणांनी अधिक आहे. विषयनिहाय कट-ऑफ ८ गुण निश्चित करण्यात आली आहे. सुमारे ३१.६५ टक्के परीक्षार्थी यशस्वी ठरले असून, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही कामगिरी अधिक चांगली मानली जात आहे. झोननिहाय कामगिरीतही अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. आयआयटी दिल्ली झोनमधील शुभम कुमारने प्रथम क्रमांक पटकावला. आयआयटी मद्रास झोनचा मोहित शेखर शुक्ला चौथ्या स्थानावर राहिला. आयआयटी मुंबई झोनच्या बी. जयकृष्ण श्रीनिवासने सहावा क्रमांक मिळवला. आयआयटी रूडकी झोनचा निकुंज अग्रवाल ११ व्या, आयआयटी कानपूर झोनचा रिद्धेश अनंत बंडाले १८ व्या, तर आयआयटी भुवनेश्वर झोनचा भावेश पात्र २९ व्या स्थानावर राहिला. आयआयटी गुवाहाटी झोनच्या यशराज सिने १२२ वा क्रमांक मिळवला. महिला उमेदवारांमध्ये आयआयटी दिल्ली झोनची आरोही देशपांडे अव्वल ठरली. तिने ३६० पैकी २८० गुण मिळवत अखिल भारतीय गुणवत्ता यादीत ७७ वे स्थान मिळवले. विशेष म्हणजे, जेईई ॲडव्हान्स्ड ही देशातील २३ भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रमुख परीक्षा आहे.









