लोकवाहिनी न्यूज
कोलकाता : मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील पहिल्या भाजप सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार राजभवनात संपन्न झाला. वंदे मातरम आणि राष्ट्रगीताच्या गजरात राज्यपाल आर. एन. रवी यांनी एकूण ३५ नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या महाविस्तारामुळे सुवेंदू मंत्रिमंडळातील सदस्यांची एकूण संख्या आता ४१ झाली आहे.
बंगालमधील भाजपच्या दीर्घकालीन धोरणाचा भाग म्हणून या मंत्रिमंडळाने प्रादेशिक संतुलन आणि सामाजिक समीकरणे अत्यंत काळजीपूर्वक साधली आहेत.
तपस रॉय, मनोज ओराव, अर्जुन सिंह, गौरीशंकर घोष, दीपक बर्मन, शरदवत मुखर्जी, अरुप कुमार दास, स्वपन दासगुप्ता, कल्याण चक्रवर्ती, शंकर घोष आणि दुधकुमार मंडल यांनी पूर्ण कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. तर मालती राभा रॉय, राजेश महतो आणि इंद्रनील खान यांना स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे. दरम्यान, अशोक दिंडा, कौशिक चौधरी, ज्यूएल मुर्मू, हरेकृष्ण बेरा, शांतनु प्रमाणिक, उमेश राय, पूर्णिमा चक्रवर्ती, भास्कर भट्टाचार्य, दिबाकर घरामी, नादिया चंद बाऊरी, गार्गी दास घोष, अमिया किसकू, कलिता माजी, बिराज बिस्वास, सुमणा सरकार, आनंदमय बर्मन, विशाल लामा आणि दीपांकर जाना यांनी राज्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराचे बारकाईने विश्लेषण केल्यास हे स्पष्टपणे दिसून येते की, ज्या घटकांनी ममता बॅनर्जींचा अभेद्य किल्ला पाडण्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती, त्यांना भाजपने निराश केलेले नाही. शपथविधी सोहळ्यात, बहुतेक मंत्री पारंपारिक बंगाली पोशाख परिधान केलेले दिसले. यातून भाजप बंगालच्या संस्कृती आणि अस्मितेशी खेळवर जोडलेला आहे, हा संदेश देण्याचा प्रयत्न होता. या ऐतिहासिक प्रसंगी केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार, शांतनु ठाकूर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्रमिक भट्टाचार्य आणि कॅबिनेट मंत्री अग्निमित्र पाल यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. ९ मे रोजी, ब्रिगेड परेड मैदानावर सुवेंदू अधिकारी यांनी अग्निमित्र पाल, दिलीप घोष, निशिथ प्रमाणिक, अशोक कीर्तनिया आणि खुदीराम टड यांच्यासह मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.









