लवकरच पावसाळ्याला सुरुवात होण्याची शक्यता
लोकवाहिनी न्यूज:नवी दिल्ली: सध्या उन्हाच्या झळा देशभरातील नागरिकांच्या डोक्यावरून अभिषेक करीत आहेत. सर्वजण उष्णतेच्या तीव्र लाटेने हैराण झाले असतानाच मान्सूनबाबत दिलासादायक आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या उपग्रह प्रतिमांमध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर मोठ्या प्रमाणात मान्सूनचे ढग तयार होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हे ढग वेगाने भारतीय किनारपट्टीच्या दिशेने सरकत असल्याने लवकरच पावसाळ्याला सुरुवात होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली.
शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या INSAT-3DS थर्मल इन्फ्रारेड उपग्रह प्रतिमांमध्ये दक्षिण अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि पूर्व हिंद महासागर परिसरात दाट ढगांचे मोठे पट्टे दिसून आले. विशेषतः श्रीलंकेच्या दक्षिण भागाजवळ आणि आग्नेय अरबी समुद्रावर ढगांची मोठी निर्मिती झालेली आढळली आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, हा भाग नैऋत्य मान्सूनच्या आगमनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
मान्सून आता भारताच्या पारंपरिक प्रवेशद्वार असलेल्या केरळकडे वेगाने सरकत असल्याचे संकेत मिळत आहेत. सध्याची स्थिती कायम राहिल्यास केरळमध्ये मान्सूनचे आगमन नेहमीच्या वेळेपेक्षा किंचित आधी किंवा वेळेत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा पाऊस हळूहळू संपूर्ण द्वीपकल्पीय भारत आणि पुढे मध्य व उत्तर भारताकडे सरकेल.
दरम्यान, देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेने कहर केला आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. अनेक शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमान ४२ अंशांच्या वर कायम आहे. त्यामुळे नागरिक उष्णतेने अक्षरशः हैराण झाले आहेत.







