उल्लंधन केल्यास थेट गुन्हा दाखल होणार
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नागपूर शहरातील ओयो, हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस आणि होम-स्टेमध्ये बेकायदेशीर घडामोडींना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिस आयुक्तालयाकडून ‘ऑपरेशन शक्ती’ राबविण्यात येत असून, नव्या अधिसूनचनेनुसार मानवी तस्करी, बेकायदेशीर देहविक्री आणि फसवणुकीच्या घटना रोखण्यात येतील. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ही अधिसूचना जारी केली आहे.
या अधिसूचनेतील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, लॉज व गेस्ट हाऊस मालक, व्यवस्थापाकांवर कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.
मार्गदर्शक नियम
झिरो टॉलरेंस बोर्ड अनिवार्य : प्रत्येक ओयो व हॉटेलच्या मुख्य भागात ‘मानवी तस्करी आणि बेकायदेशीर कामांना थारा दिला जाणार नाही’ अशा आशयाचा ‘झिरो टॉलरेंस’ चा स्पष्ट व ठळक बोर्ड लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
कडक ओळख पडताळणी : ग्राहकांना खोली देण्यापूर्वी त्यांचे मूळ ओळखपत्र (पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स इ.) तपासून संपूर्ण माहिती रजिस्टर किंवा डिजिटल प्रणालीमध्ये नोंदवणे बंधनकारक आहे. ओळखपत्रावर जन्मदिनांक व स्थायी पत्ता असणे आवश्यक आहे. (पॅन कार्ड सामान्यतः स्वीकारले जाणार नाही).
अविवाहित जोडप्यांसाठी नियम : दोन्ही व्यक्ती सज्ञान (१८ वर्षे किंवा त्याहून अधिक) असल्यास संमतीने हॉटेलमध्ये राहणे कायदेशीर आहे, मात्र त्यांची वयाची व निवासाची कडक शहानिशा करून रजिस्टरमध्ये नोंद घेणे अनिवार्य असेल.
सीसीटीव्ही देखरेख व १ वर्षाचा बॅकअप : हॉटेलच्या प्रवेशद्वारापासून लॉबीपर्यंत २४ तास सीसीटीव्ही सुरू असावेत व त्याचा फुटेज रेकॉर्ड किमान १ वर्षाचा असावा. कॅमेरे नादुरुस्त असल्यास त्वरित दुरुस्त करणे बंधनकारक आहे.
अल्पवयीन व्यक्तींबाबत नियम : अल्पवयीन व्यक्तींच्या बाबतीत कडक पडताळणी केली जाईल आणि पालक सोबत असल्याशिवाय त्यांना प्रवेश दिला जाणार नाही.
कर्मचाऱ्यांची माहिती : हॉटेलमधील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची ओळखपत्रे, रहिवासी दाखले व फोन नंबरची अद्ययावत फाइल मालकाकडे असणे आवश्यक आहे.
बोगस ब्रँडिंगवर कारवाई : नागपूर पोलिस आणि ओयो कंपनीने संयुक्त कारवाई करून अनधिकृतपणे ओयोचे नाव वापरणाऱ्या २० पेक्षा जास्त हॉटेल्सचे साइनबोर्ड हटवले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे.











