लोकवाहिनी न्यूज
कन्हान : आधुनिक काळात शेतीचे स्वरूप बदलले असून ट्रॅक्टर व आधुनिक यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र या बदलत्या काळातही आपल्या पारंपरिक संस्कृती आणि शेतीशी जोडलेल्या प्रथा जपण्याचे काम पिपरी गावातील शेतकरी आजही करीत आहेत. याच परंपरेचा एक भाग म्हणून बैल पोळा सण पिपरी-कन्हान गावात यंदाही पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पिपरी-कन्हान गावात आजही अनेक शेतकरी बैलजोडी सांभाळत असून पूर्वापार चालत आलेली ही परंपरा त्यांनी जपून ठेवली आहे. विशेष म्हणजे प्राचीन भोसलेकालीन काळापासून चालत आलेल्या बैलजोडीच्या परंपरा वारसा आजही गावात पाहायला मिळतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही बैल पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोडीना आकर्षक पद्धतीने सजवून पोळ्याच्या ठिकाणी आणले. बैलांच्या अंगावर रंगीबेरंगी सजावट, गोंदे व विविध अलंकार करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात पारंपरिक आणि उत्साहीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यावेळी व्यावसायिक सुभाष मोतीराम तिवाडे यांच्या हस्ते महासम्राट बळीराजा (कालखंड सुमारे इसवी सन पूर्व १५००) यांच्या प्रतिमेची पूजा करून सुरवात करण्यात आली व बैलजोडीच्या शेतकऱ्यांना दुपट्टाने स्वागत करण्यात आले. आंब्याच्या पानांचे तोरण तोडून पारंपरिक पद्धतीने पोळा फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. तोरण तोडल्यानंतर शेतकऱ्यांनी घोषणा देत ‘अन्नदाता सुखी भव’ व ‘ईडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे’ अशा घोषणा देण्यात आल्या. शेतीमध्ये आधुनिक यंत्रांचा वापर वाढला असला तरी बैल आणि शेतकरी यांचे नाते आजही कायम आहे.
याप्रसंगी थानेदार मंडवधारे यांच्यासह सुभाष तिवाडे, शांताराम जळते गुरुजी, सुधाकर तिवाडे, नगराध्यक्ष राजेंद्र शेंडे, सत्तापक्ष गटनेते मनोज कुरडकर, नगर सेविका आशा आकाश महातो, नगरसेवक केतन भिवगडे, माजी नगरसेविका संगीता खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते संजय ठाकरे, प्रशांत बाजीराव मसार, संदीप शेंडे, नितीन मेश्राम, गौतम नितनंवरे आदीसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.












