तान्हा (लाकडी बैल) पोळ्याला २३७ वर्षे पूर्ण
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : शहरात बैल पोळा उत्साहात संपन्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा भरवण्याची परंपरा वर्षानुवर्ष सुरू आहे. यंदा लाकडी बैलांच्या (तान्हा) पोळ्यास २३७ वर्ष पूर्ण होत आहेत. भारत हा कृषिप्रधान देश असून भारतात सर्वत्र पोळा बैलांचा सण म्हणून साजरा केला जातो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळा या दिवशी लहान मुले लाकडी बैलांचा पोळा साजरा करतात.
विदर्भ वगळता कुठेच हा पोळा साजरा केला जात नाही. सन १७८९ मध्ये दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (द्वितीय) यांनी हा उत्सव सुरू केला. लहान बालगोपाळांना बैलांचे महत्त्व कळावे. म्हणून लाकडी बैल (तान्हा) पोळ्याची सुरुवात केली. श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (द्वितीय) यांनी लाकडी बैल तयार करून मागविले व सर्व लहान मुलांना ते वाटण्यात आले. जिवंत बैलाप्रमाणे त्या बैलांना सजविण्यात आले. आंब्याचे तोरण लावून त्याला जिलेबी, फळं, आटा चॉकलेट, बिस्किट पुढे, अशा विविध वस्तूनी तयार केलेले तोरण बांधून त्यामध्ये मुलांना उभे करून बैलांची पूजा करण्यात यायची. पूजा संपल्यानंतर तोरण तोड़ून पोळा फोडून वाजत गाजत हनुमान खिड़कीचे दर्शन घेऊन हनुमानला नारळ फोडून परत आल्यावर मुलांना खाऊ, पैसे, वाटण्यात यायचे. या प्रथेला २३७ वर्षे पूर्ण होत आहे.
राजे मुधोजि महाराज भोंसले यांनी ही प्रथा आजही कायम ठेवली आहे. राजे मुधोजी महाराज भोंसले यांच्या वाड्यात सर्वात मोठा लाकडी बैल आहे. आज सुद्धा एवढा मोठा बैल भोंसले घराण्याकडे आहे. मुधोजी राजेचे निवासस्थान सिनियर भोंसला पॅलेस, महाल, नागपूर येथे हा बैल आहे. या लाकडी बैलांची उंची आठ फूट, लांबी सहा फूट असून या बैलांच्या पायात चांदीचा तोडा घातला आहे. ज्या पद्धतीने श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (द्वितीय) वाजतगाजत मिरवणूक काढायचे त्याच परंपराला अनुसरण दरवर्षीप्रमाणे यावर्षी (दि. ११) सायंकाली ५ वाजता. मोठ्या प्रमाणात मिरवणूक निघणार आहे. २३७ वर्षानंतर आजही सुद्धा ही प्रथा राजे मुधोजी महाराज भोंसले यांनी नियमित ठेवली व यापुढील सुद्धा ही प्रथा चालू राहील, असे मत महाराजांनी व्यक्त केलेले आहे.












