पाच फुटाचा बच्चन’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच अभिनेता रितेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत लॉन्च करण्यात आला. चित्रपटाच्या टीझरला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर ट्रेलरमुळेही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट ९ ऑक्टोबरला राज्यभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
‘पाच फुटाचा बच्चन’ या चित्रपटाची कथा एका तरुण कीर्तनकार मुलीभोवती फिरते. कोल्हापुरी भाषेत कीर्तन करणारी ही मुलगी संतांचे अभंग सहजपणे सादर करते. तिच्या कीर्तनामुळे ती परिसरात लोकप्रिय होते. उंचीने पाच फूट असलेल्या या धडाडीच्या मुलीला ‘पाच फुटाचा बच्चन’ म्हणून ओळखले जाते. या भूमिकेतून अभिनेत्री श्रुती मधुदीप मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. सुमारे अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये चित्रपटातील नाट्यमय प्रसंग, कीर्तन आणि विविध व्यक्तिरेखांची झलक पाहायला मिळते. त्यामुळे चित्रपटाच्या कथेत पुढे नेमके काय घडणार, याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. मराठी संस्कृतीशी जोडलेल्या कीर्तनाच्या विषयावर चित्रपटाचा कथा आधारित आहे. या चित्रपटाची कथा यापूर्वी प्रयोगिक एकापात्री नाट्याच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली होती. या नाटकला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याचे चित्रपटात रूपांतर करण्यात आले आहे.
ट्रेलर लॉन्चवेळी रितेश देशमुख यांनी चित्रपटाचे कौतुक केले. महाराष्ट्राची संस्कृती जपणारा आणि पुरोगामी विचार मांडणारा हा चित्रपट असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या चित्रपटासाठी प्रेक्षकांची साथ महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले. राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. श्रुती मधुदीप यांच्यासह गौरी नलावडे, शशांक शेंडे, चिन्मय सुमित, क्षितीश दाते, पुष्कराज चिरपुटकर, आशय कुलकर्णी, ओमप्रकाश शिंदे, समीर पाटील आणि विनोद वनवे यांच्या भूमिका आहेत. चित्रपट ९ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.













