२० वर्षांत अर्धा ट्रिलियन डॉलरचे योगदान अपेक्षित : ३ कोटींहून अधिक रोजगारनिर्मितीची शक्यता
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : विपुल खनिजसंपत्ती, मोठ्या औद्योगिक गुंतवणुकीची क्षमता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे विदर्भ भारताच्या आर्थिक विकासाचे प्रमुख ‘मायनिंग इंजिन’ बनू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘विकसित भारत @2047’च्या संकल्पनेत विदर्भ निर्णायक योगदान देऊ शकतो, असे सांगताना पुढील २० वर्षांत देशाच्या खाण क्षेत्रातून अर्थव्यवस्थेला अर्धा ट्रिलियन डॉलरपर्यंतचे योगदान आणि तीन कोटीपेक्षा अधिक रोजगारनिर्मिती होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सच्या नागपूर लोकल चॅप्टरतर्फे हॉटेल रॅडिसन ब्लू येथे आयोजित ३६व्या राष्ट्रीय खाण अभियंता अधिवेशन आणि ‘मायनिंग फॉर विकसित भारत @2047’ या राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी खाण क्षेत्रावरील प्रदर्शनाचे उद्घाटन करून पाहणी केली. संस्थेचे अध्यक्ष अभियंता मनीष कोठारी अध्यक्षस्थानी होते. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
गडचिरोलीत ५ लाख कोटींच्या गुंतवणुकीची क्षमता
विदर्भातील खनिजसंपत्तीचा उल्लेख करताना फडणवीस यांनी गडचिरोलीतील लोहखनिज साठ्यांवर आधारित सुमारे ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि जवळपास ५० एमटीपीए पोलाद उत्पादन क्षमता विकसित होत असल्याचे सांगितले. राष्ट्रीय स्तरावरील नव्या मिशनअंतर्गत प्रस्तावित पहिल्या आठ कोलसा गॅसिफिकेशन प्रकल्पांपैकी चार प्रकल्प विदर्भात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. गडचिरोलीसह चंद्रपूर, भंडारा, नागपूर, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये खनिजांवर आधारित नवी औद्योगिक परिसंस्था उभी राहू शकते. ग्रीन स्टील, स्वच्छ तंत्रज्ञान आणि सुधारित लॉजिस्टिक कनेक्टििव्हिटीमुळे या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि आर्थिक संधी निर्माण होतील, असे फडणवीस यांनी सांगितले.
३०० प्रतिनिधी; ४० निबंध
दोनदिवसीय अधिवेशनात देशभरातून सुमारे ३०० प्रतिनिधी सहभागी झाले असून, ४० तांत्रिक संशोधन निबंध सादर करण्यात येणार आहेत. प्रगत ब्लास्टिंग तंत्रज्ञान, उतार निरीक्षण, डिजिटायझेशन, एआय, इंटेलिजेंट मायनिंग, खाण बंद प्रक्रिया, सर्क्युलर इकॉनॉमी, ऊर्जा कार्यक्षमता आणि महत्वपूर्ण खनिजे या विषयावर विविध तांत्रिक सत्रे होणार आहेत.
मूल्यवर्धित उद्योगांची गरज
डब्लूसीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. हेमंत पांडे यांनी नागपूरला देशाची ‘मायनिंग कॅपिटल’ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने अधिवेशनाचे आयोजन केल्याचे सांगितले. डब्लूसीएलने १२ खाणींमध्ये १८ महत्वपूर्ण खनिजे आणि दुर्मीळ मृदा मूलद्रव्ये शोधली असून, कोयशापलीकडे जाऊन महत्वपूर्ण खनिजांच्या उत्खनन व शुद्धीकरणाच्या दिशेने कंपनी वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.
लिथियम, दुर्मीळ मृदा मूलद्रव्ये
केंद्रीय कोयसा व खाण मंत्री जी. किशन रेड्डी प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी पाठविलेल्या संदेशात भारताच्या हरित ऊर्जा संक्रमणसाठी आणि संसाधन सुरक्षेसाठी लिथियम व दुर्मीळ मृदा मूलद्रव्यांसारख्या महत्वपूर्ण खनिजांची उपलब्धता व सुरक्षितता अत्यंत आवश्यक असल्याचे म्हटले. मायनिंग डिव्हिजन बोर्डचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुमन यांनी खनिजे ही आधुनिक उद्योग, पायाभूत सुविधा आणि भारताच्या विकासाची मूलभूत गरज असल्याचे सांगितले. एआय, ऑटोमेशन, ड्रोन, सेन्सर्स आणि रिअल-टाइम खाण निरीक्षण यामुळे खाणकाम अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि शाश्वत करता येईल, असे त्यांनी नमूद केले.












