पावसाच्या हजेरीमुळे मिरवणुकीतील सारेच चिंब | उत्सवात राजकीय रंगांचीही मुक्तहस्ते उधळण
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : सुमारे दीडशे वर्षांची परंपरा पूर्ण होत असलेल्या नागपुरातील मारबत उत्सवात यंदा पावसाने सगळ्यांना झिंगझिंग झिंगाट आणि चिंब केले. पोळ्याच्या पाडव्याला निघणाऱ्या या मिरवणुकीत दुपारी एक वाजताच्या सुमारास पारंपरिक काळी आणि पिवळ्या मारबतीचे मिलन झाले. नागपुरातील इडापिडा घेऊन जा गे मारबत म्हणत अनेकांनी मारबतीला नमस्कार केला.
मारबत उत्सवात राजकीय रंगही बघायला मिळाले. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्या नेतृत्वात केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात ‘सरकारला घेऊन जा गे मारबत’ अशी घोषणाबाजी केली गेली. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानेही मारबत मिरवणुकीचे स्वागत केले. आमदार प्रवीण दटके यांचे राजकीय शक्तिप्रदर्शन महालच्या बडकस चौकात दिसले.
महापौर नीता ठाकरे, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेता बाल्या बोरकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आभा पांडे, आयुक्त विश्वास नांगरे पाटील, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, मनपा आयुक्त विपिन इटणकर यांनी काळी-पिवळी मारबत यांचे मिलन होते, त्या नेहरू पुतळा चौकात मिरवणुकीत हजेरी लावली. यावेळी फ्रान्स, इंग्लंड आणि फिनलंडच्या राजदूतांसह अभिनेते अंकुश चौधरी हे देखील उपस्थित होते.
तुम तो ठहरे परदेसी
विदेशीतील राजदूत आल्याची घोषणा झाल्यानंतर लगेचच नेहरू पुतळा चौकात ‘तुम तो ठहरे परदेसी’ हे गाणे लागण्याचा योगयोग जुळून आला आणि तरुणाईने सगळ्या विदेशी पाहुण्यांचे हात उंचावून स्वागत केले. या पाहुण्यांनीही त्यानंतर लगेच लागलेल्या झिंगझिंग झिंगाट गाण्यावर फेर धरला. यावेळी जोरदार पावसानेही हजेरी लावली.
मारबत उत्सवाच्या निमित्ताने तैनात असलेल्या सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह सुमारे हजारावर पोलिस कर्मचारी, होमगार्ड, अग्निशमन दलाचे जवान, मनपाचे अधिकारी-कर्मचारी, महावितरणचे अधिकारी-कर्मचारी पावसामुले पूर्ण ओलेचिंब झाल्याचे बघायला मिळाले.
मोबाइल ठप्प
मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर बडकस चौकापासून गांधी पुतळा, सराफा बाजार, दही बाजार, नेहरू पुतळा परिसरात मुंगीलाही पाय ठेवायला जागा मिळणार नाही, इतकी गर्दी झाली. त्यामुळे सर्वच कंपन्यांची मोबाइल आणि फोन यंत्रणा कोलमडली. दुपारी दीड वाजेपर्यंत या भागातील फाइव्ह जी इंटरनेटची सेवा फोर जी आणि श्रीजीवर काम करीत होती. फोनही लागत नव्हते.











