नागपूर : गुन्हेगारीमुक्त नागपूरचे ध्येय घेऊन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृखाली शहर पोलिसांनी कारवाईचा वेग वाढविला आहे. या मोहिमेत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक अग्रवाल यांनीही आक्रमक पवित्र घेतला आहे. अमली पदार्थांची तस्करी, अवैध दारूविक्री, जुगार, वाहनचोरी, घरफोडी आणि प्रतिबंधित शस्त्राविरोधात गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका लावला आहे. नरेंद्रनगर परिसरात सुमारे १.४० कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त करण्याची अलीकडील कारवाई या मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट पाचने बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरेंद्रनगर परिसरातील विजया अपार्टमेंटमध्ये छापा टाकून १ हजार ४०४ ग्राम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले, या अमली पदार्थाची किंमत सुमारे १ कोटी ४० लाख रुपये असून, वाहनांसह रोख रक्कम, मोबाईल आणि अन्य साहित्य मिळून जप्त मुद्देमालाचे मूल्य सुमारे १ कोटी ५४ लाख रुपये आहे. या प्रकरणात पाच जणांना ताब्यात घेण्यात आले, पुढील तपासादरम्यान कथित मुख्य पुरवठादार विशाल उर्फ फळ्ळी गुप्ता यालाही तामिळनाडूच्या रामेश्वरमच्या दिशेने जाताना पकडण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोळे यांच्या पथकाने डीसीपी दीपक अग्रवाल आणि एसीपी वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनखाली ही कारवाई केली.
अग्रवालांचा जबरदस्त धडाका अमली पदार्थाविरोधातील कारवाईची उपलब्ध आकडेवारी पोलिसांच्या मोहिमेची व्याप्ती स्पष्ट करते. जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत गुन्हे शाखा आणि संबंधित पथकांनी अमली पदार्थांशी संबंधित ६२८ प्रकरणे नोंदविली, तर ७६५ आरोपींना अटक केली. या काळात सुमारे ५.१७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. मागील वर्षी याच कालावधीत ४५५ प्रकरणे, ५८३ अटक आणि २.४७ कोटी रुपयांच्या अमली पदार्थांची जप्ती झाली होती. एमडीविरोधातील कारवाई विशेष उल्लेखनीय ठरली. जानेवारी ते ऑगस्टदरम्यान ७३ प्रकरणात एमडी जप्त करण्यात आले आणि ११० आरोपिंंना अटक झाली. मागील वर्षी याच कालावधीत तुलनेने कमी एमडी जप्त झाले होते. त्यामुळे यंदा जप्तीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पोलिसांनी किरकोळ विक्रेत्यांपुरता मर्यादित न राहता पुरवठादार, आंतरराज्यीय नेटवर्क आणि संघटित टोळ्यांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला आहे.
जुगारापासून नायलॉन मांजापर्यंत पोहोच
गुन्हे शाखेची मोहिम केवळ अमली पदार्थांपुरती मर्यादित नाही. सप्टेंबरमध्ये अवघ्या दोन दिवसांत ८ आणि ९ सप्टेंबर रोजी जुगार, अवैध दारू, प्रतिबंधित शस्त्रे, वाहनचोरी, घरफोडी आणि नायलॉन मांजाविरोधात १८ कारवाई करण्यात आल्या. या मोहिमेत २१ आरोपी किंवा वॉन्टेड आरोपीवर कारवाई करून ३०.८५ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. २२ आणि २३ सप्टेंबर रोजीच्या स्वतंत्र मोहिमेत ३० प्रकरणांचा उलगडा करून २५ हुन अधिक आरोपींना अटक करण्यात आली आणि सुमारे १३.३७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. त्यानंतर २४ आणि २५ सप्टेंबर रोजी आणखी एका मोहिमेत २३ प्रकरणे नोंदवून २३ आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईमध्ये अवैध दारू, एमडी, वाहनचोरी आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
लोकवाहिनीने वेधले होते लक्ष
शहरातील एमडी तस्करीबाबत लोकवाहिनीने वृत्त मालिका प्रकाशित केली होती. प्रचंड माहिती असताना नाही पोलिसांची एमडी विरोधीतील कारवाई किंवा दोन आणि तीन ग्रामपर्यंत मर्यादित का राहते? असा सवाल या निवृत्त मालिकेतून करण्यात आला था. या सर्व वृत्त मालिकेची पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक अग्रवाल यांनी अत्यंत गंभीरपणे दखल घेतली. नागपूर शहरातील युवा पिढीला नश्याच्या विळख्यात अडकण्यापासून वाचवण्याची लोकवाहिनीची तळमळ पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि उपायुक्त दीपक अग्रवाल यांनी जाणली आणि त्यानंतर कारवाईला आणखी वेग दिला. त्यामुळे नागपूर शहरातील अमली पदार्थांचे रॅकेट आता कमकुवत होताना दिसत आहे.














