लोकवाहिनी न्यूज
नागपुर : मारबत महोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील प्राचीन, पारंपरिक व सांस्कृतिक ओळख असलेल्या मारबतीच्या जनजાગृतीसाठी नागपुर महानगरपालिकेच्या वतीने व ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबच्या साहाय्याने आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १०) कविवर्य सुरेश भट सभागृह येथे करण्यात आले.
या प्रसंगी ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबचे अध्यक्ष महेश काळबांडे, सचिव नरेश नरकर, कोषाध्यक्ष नितेश बाहे तसेच सदस्य, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येनें उपस्थित होते.
महापौर ठाकरे यांनी सांगितले की, नागपूरच्या प्रसिद्ध अशा मारबत परंपरेला बघण्यासाठी दरवर्षी डेढ़ ते दोन लाख नागरिकांची गर्दी असते, पण तरीही अजूनही मोठ्या संख्येतील नागरिकांना याविषयी माहिती नाही हे ही तितकेच सत्य असल्याने अशा एका जुन्या पारंपरिक उत्सवाला नागरिकांपर्यंतच नव्हे तर देशभरात आणि जगभरात प्रचारित व प्रसारित करण्याच्या उद्देशाने नागपुर महानगरपालिकेच्या वतीने मारबत महोत्सव घेण्यात आला. यातील एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे छायाचित्र प्रदर्शन होय, ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लब यांच्या सहकार्याने शहरातील पारंपरिक उत्सवाचे देखणे दृश्य हे शहरातीलच नव्हे तर बाहेरून उत्सव बघायला येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांना बघता येणार आहे. या माध्यमातून हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे.
यावेळी महापौरांनी ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबच्या सर्व सदस्यांचे आभार मानले व त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी व त्यांनी आयोजनात दिलेल्या प्रत्यक्ष सहभागाकरिता कौतुक केले. महापौरांनी शुक्रवारी होणाऱ्या मारबत कार्यक्रमाची माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले यांच्या उपस्थितिसह विदेशातून इटली व फ्रांससह अजून दोन देशाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. यामुळे जागतिक स्तरावरही मारबतीच्या परंपरेची आणि केवळ नागपुरात होणाऱ्या सणाची माहिती मिळेल, असे मत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित सदस्य, नागरिकांनी प्रदर्शनातील विविध सुंदर छायाचित्रांचा डोळे भरून आनंद घेतला. मारबत समयीचे विविध दृश्य, जनतेच्या उत्साहात मारबतीचे आगमन ते मारबतीला दहन करण्या पर्यंतचे निरनिराळे क्षण, यावेळी स्थानिक संस्कृतीतील प्रात्यक्षिकांचे असे अनेक कलात्मक आणि नावीन्यपूर्ण छायाचित्रानी भरलेल्या प्रदर्शनाला बघण्याचा आनंद घेतला. विशेष म्हणजे जुन्या काळापासून तर मागील वर्षांच्या मारबत उत्सवातील क्षणापर्यंत अनेक छायाचित्र विविध छायाचित्रकारांच्या माध्यमातून टिपून प्रदर्शनी निवडण्यात आले आहे. सोबतच छायाचित्र स्पर्धेसाठी ५ छायाचित्रांची निवड करण्यात आली.
छायाचित्रकारांची पुरस्कारासाठी निवड
महापौरांच्या उपस्थितीत निकाल घोषित करण्यात आला. अनिरुद्ध सिंग दिनोरे हे प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले. द्वितीय पुरस्कार राहुल मिश्रा, द्वितीय पुरस्कार युगल सावरकर, प्रथम उत्तेजनार्थ स्नेहल सोनटक्के, तर द्वितीय उत्तेजनार्थ पुरस्कार देवांशू उकळे यांना मिळाला. स्पर्धेचे परीक्षण छायाचित्रकार नाना मिसाल व छायाचित्रकार विनोद राऊत यांनी केले. पुरस्कार समारोह शुक्रवारी आयोजित करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबचे माजी अध्यक्ष गजानन रणडे यांनी केले.













