भीमनवार यांच्या राजीनाम्यासह रोहित पवारांची मागणी
लोकवाहिनी न्यूज
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी २६ सप्टेंबर रोजी पुण्यात विद्यार्थ्यांसोबत आंदोलन करण्याची घोषणा केली. आंदोलनात एमपीएससी अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी प्रमुख असणार आहे. रोहित पवार यांनी यापूर्वीही भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच त्यांच्या जागी तुकाराम मुंडे यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली. अध्यक्षपदाच्या निकषा अनुसार मुंडे पात्र ठरू शकतात, असे पवार यांनी म्हटले.
७ सप्टेंबर रोजी पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा झाला होता. त्यानंतरही मागण्यांवर निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार गणेशोत्सवानंतर २६ सप्टेंबरपासून पुण्यात विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागी होणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले आहे. याबाबत पुणे पोलिसांना पत्राद्वारे माहिती देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या आंदोलनातील आणखी एक प्रमुख मागणी म्हणजे एमपीएससीने सर्व रिक्त पदांवर तत्काळ भरती प्रक्रिया सुरू करावी. २०२६ मध्ये ७० हजार पदांची मेगाभरती सुरू करण्याची मागणी पवार यांनी केली. तसेच राजस्थानच्या धर्तीवर १०० रुपयांच्या कार्डच्या माध्यमातून वर्षभर परीक्षा घेण्याची मागणीही विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
दुष्काळी पॅकेज जाहीर करा : रोहित पवार
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळा परिसरात दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. पावसाअभावी सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. गेल्या वर्षाच्या अतिवृष्टीची नुकसानभरपाई आणि पीकविम्याची रक्कम अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफीतील उर्वरित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणीही त्यांनी केली. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, तसेच शेतात काम नसलेल्या आलेल्या मजुरांच्या कुटुंबांना २५ हजार रुपयांची मदत द्यावी, असेही त्यांनी म्हटले. कर्नाटक आणि तमिळनाडूप्रमाणे महाराष्ट्राने दुष्काळी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी करत शेतकरी, मजूर आणि विद्यार्थ्यांना तातडीने मदत देण्याचे आवाहन पवार यांनी सरकारला केले.
एमपीएससीच्या परीक्षांमधील कथित गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे वृत्त आहे. यापूर्वीच पुण्यासह राज्यातील विविध ठिकाणी विद्यार्थी आंदोलन केले आहे. आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणावी आणि संबंधित प्रकरणांमध्ये कारवाई करावी, अशी मागणीही आंदोलकांकडून येत आहे. दरम्यान, एमपीएससी अध्यक्ष विवेक भिमनवार यांनी यापूर्वी संबंधित घटना आपल्या पदभार स्वीकारण्यापूर्वीची असल्याचे स्पष्ट केले आहे. दोष सिद्ध झाल्यास राजीनामा देण्याची तयारी असल्याचेही त्यांनी म्हटल्याचे वृत्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागण्या, आयोगाची भूमिका आणि सरकारकडून होणारी पुढील कारवाई याकडे आता लक्ष लागले आहे. २६ सप्टेंबरच्या आंदोलनात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये आणि पोलिसांनी सहकार्य करावे, अशी मागणीही त्यांनी केली.











