देशात अराजकता निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : संविधानाचे पुस्तक हातात घेऊन देशातील घटनात्मक संस्थांवरच हल्ले करण्याचा प्रयत्न राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष करीत आहे. राहुल गांधी यांच्या मेंदूची चोरी झाली असून, तो मेंदू शोधण्यासाठी समिती नेमा. संविधानावरील लोकांचा विश्वास उडवून देशात अराजकता निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज नागपुरात रामगिरी येथे माध्यमांशी ते बोलत होते.
राहुल गांधी यांनी केलेल्या वोट चोरीच्या आरोपांसंबंधी निवडणूक आयोगाच्या तिन्ही आयुक्तांनी वास्तव स्पष्ट केल्यामुळे राहुल गांधी यांचे फेक नॅरेटिव्ह पूर्ण उद्ध्वस्त झाले असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संविधानाने दिलेली लोकशाहीच राहुल गांधी यांना मान्य नाही, घटनात्मक संस्था त्यांना मान्य नाहीत. एका वृत्तपत्रातील संबंधित बातमी कपोलकल्पित असल्याचे आणि त्यावरून सुरू केलेले आंदोलन नकली असल्याचे निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणामुळे उघड झाले आहे. एसआयआरसह सर्व प्रक्रिया एकमताने झाल्याचे तिन्ही निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. कॅबिनेट सेक्रेटरींना पाठविलेल्या एका पत्रावरून काँग्रेस संभ्रम निर्माण करीत आहे, मात्र हे पत्र एसआयआरशी संबंधित नव्हते तर एका डेप्युटेशनवरील तात्कालिक नियुक्तीच्या संदर्भातील होते, हेदेखील आयोगाने स्पष्ट केले आहे. जो फॉर्म ६ सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरविला, त्याविषयी संभ्रम निर्माण करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाविषयी संभ्रम निर्माण करणे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. लोकांमध्ये विश्वास निर्माण करता येत नाही म्हणून सिस्टीमविषयीच अविश्वास निर्माण करण्याचा हा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे, मात्र कितीही प्रयत्न केला तरी त्यात ते यशस्वी ठरणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.














