नागपुर : महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागांतर्गत कार्यरत सुरक्षा व अंमलबजावणी विभागांतर्गत असलेल्या भरारी पथकांनी वीजचोरी आणि अनधिकृत वापரா विरोधात धडक कारवाई मोहीम राबवत अवघ्या सहा महिन्यांत (एप्रिल ते सप्टेंबर २०२६) तब्बल २१.३६ कोटी रुपयांचे वीजचोरी व अनिषमिततेचे गैरप्रकार उघडकीस आणले आहेत. नागपूर परिक्षेत्रातील भरारी पथकांनी संपूर्ण विदर्भात ५,१९१ वीज जोडण्यांची सखोल तपासणी करून ही मोठी कामगिरी बजावली आहे.
मोहिमेदरम्यान, विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अंतर्गत १,३११ ग्राहकांकडे १४.६५ कोटी रुपयांची थेट वीज चोरी उघडकीस आणण्यात आली. तर कलम १२६ आणि इतर ४८१ प्रकरणांमध्ये ६.५० कोटी रुपयांची अनियमितता आढळून आली आहे. महावितरणच्या प्रभावी वसुली मोहिमेला राबवून येथील करदात्याकडून १५.६३ कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात यश आले आहे. तसेच, वीज चोरीची रक्कम न भरणाऱ्या १११ ग्राहकाविरुद्ध विविध पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विभागाच्या या मोहिमेचा मंडळनिहाय आढावा पाहता अकोला ३२७.३० लाख (वसुली १८३.४८ लाख), अमरावती १८५.५६ लाख (वसुली १६९.६३ लाख), बुलढाणा ११६.३१ लाख (वसुली ९६.०१ लाख), भंडारा १५६.६० लाख (वसुली १३२.२८ लाख), चंद्रपूर १८४.३९ लाख (वसुली ९६.५४ लाख), नागपूर शहर २१३.६० लाख (वसुली १८५.५५ लाख), नागपूर ग्रामीण १२७.५९ लाख (वसुली ७१.३७ लाख), वर्धा ९६.८२ लाख (वसुली ४३.८९ लाख), यवतमाळ ११२.३७ लाख (वसुली ९२.५२ लाख), गोंदिया १००.४० लाख (वसुली ७४.३४ लाख), गडचिरोली ७६.१२ लाख (वसुली ६६.९० लाख) आणि वाशीम जिल्ह्यात २४३.३६ लाख (वसुली ११७.१९ लाख) रुपयांचे निर्धारण करण्यात आले. वाशीमशिवाय अकोला शहर, अमरावती शहर व नागपूर सिव्हिल लाइन्स या विभागातूनही २३३.२१ लाखांचे निर्धारण करून १७३.३३ लाखांची वसुली करण्यात आली आहे.
महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) अपर्णा गिते (म.पो.से.) आणि नागपूर परिक्षेत्राचे उपसंचालक सुनील थापेकर यांच्या नेतृत्वाखाली विदर्भात मंडळ स्तरावर १२ विशेष भरारी पथके व विभागीय स्तरावर ३ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय, नागपूर आणि अकोला येथे सुरक्षा व अंमलबजावणी परिमंडळ कार्यालय कार्यरत आहेत. वीजचोरी हा गंभीर सामाजिक व कायदेशीर अपराध असल्याने नागरिकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊनच वीज वापरावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. तसेच परिसरात वीजचोरी आढळून आल्यास त्याची गोपनीय माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव गुप्त ठेवून त्यास महावितरणतर्फे योग्य ते बक्षीस दिले जाईल. महावितरणचे विशेष भरारी पथक वीजचोरीच्या आधुनिक व क्लिष्ट प्रकारांवर बारीक लक्ष ठेवून कारवाई तीव्र करणार आहे. ही भरारी पथके वीज मीटरमधील फेरफार, सीटी व पीटीमधील छेडछाड, इलेक्ट्रॉनिक बायपास, थेट वीज जोडणी तसेच अनधिकृत वीज वापराशी संबंधित इतर सर्व गंभीर अनियमितता शोधून काढणार आहेत. अंशास्पद जोडण्यांची तातडीने सखोल तपासणी करून, जेथे मीटरमध्ये फेरफार आढळेल ती प्रकरणे थेट कायदेशीर वीजचोरीच्या गुन्ह्यांमध्ये रूपांतरित करून कठोर कारवाई केली जाणार आहे.















