निवडणूक लढण्यावर जवळपास निश्चित
लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात बंडखोरी करून भाजपसमोर मोठं आव्हान उभं करणारे माजी आमदार अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज माघारीच्या एक दिवसापूर्वीच अचानक नॉट रिचेबल झाले. ९ ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना, सोले यांच्या या ‘साइलेंट स्ट्राईक’मुळे भाजप नेतृत्वाचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.
सुधाकर कोहळे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अनिल सोले यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. बंडखोरी शमवण्यासाठी बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी भाजपच्या कोर इलेक्शन कमिटीची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. सर्वानीच सोले यांच्या बंडखोरीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. बैठकीदरम्यान नितीन गडकरी यांनी सोले यांना थेट संपर्क साधण्यास सांगितले; मात्र, त्यांचा फोन बंद येत असल्याने नेत्यांचा निरुपाय झाला.
यापूर्वी भाजपचे प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अनिल सोले यांची समजूत काढण्यासाठी थेट त्यांच्या घरी पोहोचले होते. मात्र, सोले नागपुरात असूनही त्यांनी प्रदेशध्यक्षांची भेट घेण्याचे मूग गिळल्याची चर्चा रंगली होती. आता थेट संपर्क यंत्रणाच बंद करून त्यांनी पक्षाला ठणकावून सांगितले आहे की, ते कोणत्याही परिस्थितीत माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीत.
यापूर्वी याच मतदारसंघातून विजयी झालेले अनिल सोले यांचे गेल्या निवडणुकीत पक्षाने तिकीट कापले होते, ज्याचा फटका भाजपाला पराभवाच्या रूपाने बसला होता. यावेळी पक्ष आपली चूक सुधारेल अशी अपेक्षा सोले यांना होती. मात्र भाजपने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली. या निर्णयाने दुखावलेल्या सोले यांनी आधीच अपक्ष लढण्याची घोषणा केली होती. इतकेच नव्हे तर, सोले यांच्या गटाकडून भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या उमेदवारी अर्जावर तांत्रिक आक्षेपही घेण्यात आला होता.
८ ऑक्टोबर रोजी अनिल सोले अचानक संपर्काबहाहेर गेल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली असून, नेत्यांकडून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितलं जात आहे. उद्या, ९ ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. अनिल सोले हे पक्षाच्या दबावाला बळी पडून अर्ज मागे घेणार की अपक्ष लढून भाजपच्या अडचणी वाढवणार, याकडे संपूर्ण विदर्भाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
वाड्याजवळच प्रचार कार्यालय
सोले हे निवडणुकीतून माघार घेणार नसून, भाजपचे माजी आमदार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे मानले जाणारे नेते गिरीश व्यास यांच्या बडकस चौकातील कार्यालयातूनच आपला प्रचार सुरू करणार आहेत. या कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाली ५ वाजता होणार आहे. विशेष म्हणजे हे कार्यालय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे आमदार प्रवीण दटके यांच्या निवासस्थानापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. गडकरींच्या घराजवळच पक्षाच्या बंडखोर उमेदवाराचे कार्यालय सुरू होत असल्याने, सोले यांनी भाजपच्या नेतृवाला उघड आव्हान दिल्याचे स्पष्ट झाले आहे.














