मराठी प्रेक्षकांसाठी ‘कोण यशवंत पानसरे ?’ ही नवीन वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेते भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री यांच्यात न्यायालयीन संघर्ष पाहायला मिळणार आहे. न्याय, सत्य आणि व्यवस्थेतील त्रुटी यांवर आधारित या मालिकेचे प्रीमियर १६ ऑक्टोबर २०२६ रोजी मराठी झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार आहे. आनंद दिलीप गोखले यांनी या मालिकेचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. तर मंजुरी सुबोध भावे यांच्या कान्हाज मँजिक या निर्मिती संस्थेने मालिकेची निर्मिती केली आहे.
काय आहे मालिकेची कथा?
एकेकाळी कायद्याच्या क्षेत्रात नाव कमावलेले यशवंत पानसरे आता नोटरी म्हणून काम करत आहेत. आयुष्यात आलेल्या अपयशामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी झाला आहे, अशातच अलका नावाची तरुणी बेपत्ता होते. तिचा शोध घेण्यात यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोप करत तिचे वडील सदाशिव मापारी न्यायालयाबाहेर स्वतःला पेटवून घेतात. या घटनानंतर पानसरे अन्यायाविरोधात लढण्याचा निर्णय घेतात आणि जनहित याचिका दाखल करतात. या लढ्यात त्यांना तरुण वकील जान्हवीची साथ मिळते. अलका बेपत्ता होण्यामागील सत्य शोधताना अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात. या प्रकरणात पानसरे यांचा समेच्या ताकद जाणणारे वकील सारडा यांच्याशी होतो.
कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका
भरत जाधव यशवंत पानसरे यांची भूमिका साकारणार आहेत. अपयश, अपराधीपणा आणि पुन्हा न्यायासाठी उभे राहण्याचा त्यांचा प्रवास या भूमिकेतून पाहायला मिळेल. पुष्कर श्रोत्री सारडा या वकिलाच्या भूमिकेत दिसणार असून, कायदा आणि न्यायाकडे पाहण्याच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनांतल संघर्ष ते मांडतील. शिवानी रांगोळे जान्हवी ची निर्भीड तरुण वकिलाची भूमिका साकारणार आहेत. शिवाय शर्वरी जमेनीस, उज्वला जोग, विद्याधर जोशी आणि मिलिंद फाटक हे कलाकारही मालिकेत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील.
तमिळ वेबसिरीज ‘सत्तामु निधीयम’वर आधारित ही मालिक न्यायव्यवस्थेतील प्रश्न, सत्तेचा प्रभाव आणि सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष दाखवणार आहे. त्यामुळे या मालिकेतून प्रेक्षकांना न्यायालयीन नाट्य आणि रहस्याचा अनुभव मिळणार आहे.










