सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागले गोपनीय पत्र
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : देशात केंद्र सरकारविरोधात विविध मुद्द्यांवरून सुरू असलेल्या आंदोलनांचा, विशेषतः ‘जेन झी’ आणि तरुणांमधील असंतोषचा, माओवादी संघटना आपल्या राजकीय हेतूंसाठी वापर करण्याच्या तयारीत आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सुरक्षा यंत्रणांनी माओवादी संघटनेतील २ वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमधील कथित गोपनीय पत्र हस्तगत केले आहे. त्यातील उल्लेखांमुळे या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिकृत माहितीनुसार, माओवाद्यांच्या सेलमधील ‘कॉम्रेड धीरज’ याने वरिष्ठ माओवादी पदाधिकारी ‘कॉम्रेड अजित उर्फ के. मुरलीधरन’ याला हे पत्र पाठवले आहे. या पत्रात ‘YY’ या सांकेतिक नावाने उल्लेख केलेल्या व्यक्तीने सरकारविरोधातील आंदोलनासाठी विशेष रणनीती तयार केल्याचा दावा करण्यात आल्याची माहिती आहे.
‘जेन झी’च्या नेटवर्कचा वापर पत्रातील मजकुमानुसार, आगामी जनआंदोलने आणि राजकीय संघर्ष अधिक तीव्र करण्यासाठी ‘जेन झी’च्या नेटवर्कचा सक्रियपणे वापर करण्याची योजना आखण्यात आल्याचा उल्लेख आहे. सरकारविरोधात विविध मुद्द्यांवरून निर्माण झालेला असंतोष अधिक तीव्र करण्यासाठी तरुणांना आंदोलनांच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न केला जावे, असे या पत्रात नमूद असल्याचे माहिती आहे. याशिवाय, तरुणांच्या सहभागातून तळागाळात सरकारविरोधी मोहिमा राबविणे, जनआंदोलनांचा विस्तार करणे आणि सरकारवर राजकीय दबाव वाढविणे, अशा बाबींचाही कथित कृती आराखड्यात समावेश असल्याचे सांगितले जात आहे. आंदोलनांदरम्यान हिंसाचार किंवा अन्य अनुचित घटना घडल्यास त्यासाठी सरकारला जबाबदार धरण्याची रणनीती आखल्याचाही पत्रात उल्लेख असल्याचा दावा केला जात आहे.












