बेड्या ठोकल्यानंतर तपासात २१ गुन्हे उघड
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : पोलिसांची चाहूल लागताच चोरीची दुचाकी जागेवरच सोडली आणि तिथून काढता पाय घेतला. पण पोलिसांच्या नजरेतून तो फार काळ सुटू शकला नाही. वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा माग काढणाऱ्या गुन्हेशाखेच्या पथकाने अखेर त्याला शोधून काढले. चौकशीची चक्ररे फिरताच एक-दोन नव्हे, तर तब्बल २१ वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा उलघडा झाला. अशोक उर्फ अंशुल नितीन गर्जभिये (वय २४, रा. दतात्रयनगर, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्हेशाखेचे वाहनचोरीविरोधी पथक रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेत असताना अशोक गर्जभिये याच्याबद्दल महत्त्वाची माहिती मिळाली. तो वाहनचोरीच्या गुन्ह्यात सहभागी असून आणखी एका ठिकाणी चोरी करून रेलवेस्थानक परिसरात फिरत असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने त्याचा माग काढत त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर केलेल्या चौकशीत वाहनचोरीच्या अनेक घटनांचे धागेदोरे हाती लागले.
ठाण्याच्या हद्दीतील मेयो रुग्णालय परिसरातून एक दुचाकी चोरीला गेल्याचे समोर आले. त्यानंतर झिरो माइल परिसर जात असताना आरोपीला पोलिस दिसले. पकडले जाण्याची भीती वाटल्याने त्याने चोरीची दुचाकी तिथेच सोडून पळ काढला. मात्र, ही दुचाकी पुढे राहुल उर्फ छोटा तिवारी याने चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. राहुल उर्फ छोटा तिवारी याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. अपर पोलिस आयुक्त प्रमोद शेवाळे आणि पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेच्या वाहनचोरीविरोधी पथकाने ही कारवाई केली.












