-
नागपूर : मतदार याद्यांवरून देशभरात वादंग निर्माण झाला आहे. पात्र मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली नसून काहींची नाव कमी करण्यात आल्याचे समोर आले आहे. विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ९० हजारांवर मतदारांनी मतदान केले नाही. त्यामुळे हे मतदार कुठे गेले, नाव फक्त समाविष्ट करण्यात आले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
-
पदवीधर मतदारसंघाच्या प्रत्येकच निवडणुकीच्या वेळी मतदार नोंदणीची प्रक्रिया करावी लागते. यावेळी मतदार नोंदणीसाठी भाजप, काँग्रेससह इतरही इच्छुक उमेदवारांनी परिश्रम घेतले. नोंदणीसाठी गठ्ठा अर्ज घेणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, गठ्ठा अर्ज घेण्यात आल्याचे आरोप झाले. त्याचप्रमाणे मुदत संपल्यावरही मतदार नोंदणीचे आरोप करण्यात आले.
-
यंदा २,५५,६०३ एवढी मतदार नोंदणी झाली. पदवीधरानीच स्वतः कागदपत्रे दिल्याने मतदान जास्त होईल, अशी अपेक्षा होती. परंतु १,६५,५४१ म्हणजे ६४.७६ टक्के मतदान झाले. ९०,०६२ मतदारांनी मतदान केले नाही. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पदवीधरांकडून अर्ज घेतले आणि नोंदणी केली. त्यामुळे अनेकांना मतदार झाल्याची माहिती अखेरच्या टप्प्यात मिळाली, तर अनेकांना मतदान केंद्राची माहिती मिळाली नाही. मतदान केंद्रही बरेच लांब असल्याने काहींनी मतदान केले नसल्याची चर्चा आहे.
-
सार्वत्रिक निवडणुकीच्या यादीत मृत, स्थलांतरित मतदारांची नावे असल्याने टक्केवारी कमी दिसत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. परंतु या निवडणुकीसाठी नव्याने मतदार यादी तयार केली जाते. त्यामुळे मृत, स्थलांतरित मतदारांचा प्रश्नच राहत नाही. मतदारांची टक्केवारी ७५-८० टक्क्यांच्या घरात राहील, असा अंदाज होता, परंतु ६५ टक्केही मतदान झाले नाही. सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध असतो. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्यांपैकी एकही सक्षम न वाटल्यास ‘नोटा’चा वापर करून मतदान हक्क बजावता येते. परंतु या निवडणुकीत ‘नोटा’चा पर्याय नसतो. त्याचाही परिणाम झाल्याची चर्चा आहे.
October 26, 2026
0 Comment
0 Views
पदवीधर निवडणुकीत ९० हजारांवर मतदार गेले कुठे ?
by Digital Desk
लोकवाहिनी न्यूज नागपूर : मतदार याद्यांवरून देशभरात वादंग निर्माण झाला आहे. पात्र मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली नसून काहींची नाव कमी करण्यात आल्याचे समोर आले आहे. विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ९० हजारांवर मतदारांनी मतदान केले नाही. त्यामुळे हे मतदार कुठे गेले, नाव फक्त समाविष्ट करण्यात आले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.... Read More













