पदवीधर निवडणुकीच्या मतपेटीत दिसला दमखम
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : या निवडणुकीत मतदारांनी मला मोठा जनआधार दिला. मला पहिल्या पसंतीची सुमारे २५ हजार मते मिळाली. शिवाय बाद ठरलेल्या मतांपैकी बहुतांश मतंही मला मिळाली होती. यात मतदारांनी केलेल्या छोट्या छोट्या चुकांमुळे ही मतं बाद झाली होती. पहिल्या पसंतीची २५ हजार आणि दुसऱ्या पसंतीची मिळालेली आणखी मतं मिळून मला ३४-३५ हजार मते मिळाली. कुणाला दारू न पाजता, मटण न देता, एक रुपया न देता ही मतं मला मिळाली आहेत. तसेच आता हीच मतं निर्णायक ठरणार आहेत. मी निवडणुकीला उभा राहिलो नसतो तर एवढी रंगत आली नसती, असे नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत अपक्ष लढत असलेले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर नितेश कराळे मास्टर यांनी सांगितले.
विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी अत्यंत रोमांचक स्थितीत पोहोचली आहे. येथे भाजपच्या सुधाकर कोहळे यांनी दुसऱ्या फेरीतल्या मतमोजणीनंतर सुमारे चार हजार मतांची आघाडी घेतली. तर काँग्रेसचे अभिजित वंजारी हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मात्र कोहळे यांना आवश्यक मतांचा कोटा पूर्ण न करता आल्याने आता निकाल दुसऱ्या पसंतीच्या मतांद्वारे निश्चित होणार आहे. मात्र या मतदारसंघातील निवडणुकीत नितेश कराळे मास्टर यांनी तब्बल २५ हजार मतं घेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या मतमोजणीत नितेश कराळे तिसऱ्या क्रमांकावर असून, आता त्यांना मिळालेले दुसऱ्या पसंतीच्या मतांवर निवडणुकीचा निकाल निश्चित होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता नितेश कराळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोठं विधान केलं आहे.
विधान परिषद निवडणुकीत आपल्याला मिळालेल्या भरघोस मतदानाबाबत नितेश कराळे म्हणाले की, आपल्याला पक्षाने उमेदवारी दिली नसल्याबद्दल खंतही त्यांनी व्यक्त केली, ते म्हणाले की, मला जर उमेदवारी दिली असती तर मी पाच वाजता डीजे लावून घरी आलोअस्तो. पण त्यांनी मला तिकीट दिलं नाही. ज्या माणसासाठी काम केलं, पक्षासाठी काम केलं त्यांनी मला संधी दिली नाही. ठीक आहे. पण मतदारांनी मतदान करून माझी ताकद दाखवून दिली. कराळे मास्टर हा हलका फुलका माणूस नाही. हे मला जे हलक्यात घेत होते त्यांना या मतदानाने दाखवून दिले, असेही नितेश कराळे यांनी यावेळी सांगितले.











