पहिल्या पसंतीची अपेक्षित मते मिळाल्याचाही दावा
लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी विजय मिळविला. त्यांना प्रथम व द्वितीय पसंतीक्रमाची एकूण ६७ हजार २३१ मते मिळाली. तर त्यांचे नजिकचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीचे सुधाकर कोहळे यांना ६३ हजार १६० मते मिळाली. पराभव झाल्यानंतर सुधाकर कोहळे यांनी प्रतिक्रिया देताना पराभवाचे आत्मपरीक्षण करणार असल्याचे सांगितले.
आज माध्यमांशी बोलताना कोहळे म्हणाले, विजयी उमेदवाराचे मी अभिनंदन करतो. लोकशाहीच्या माध्यमातून जो कोणी उमेदवार विजयी होतो, त्याचे अभिनंदन केलेच पाहिजे. पहिल्या पसंतीच्या मतांचा विचार केला, तर महायुतीचा उमेदवार म्हणून मी विजयी ठरलो असतो. मात्र, निवडणूक प्रक्रियेनुसार अभिजित वंजारी विजयी झाले आहेत. त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. भारतीय जनता पक्ष कोणतीही निवडणूक संघटनेच्या बळावर लढतो. आमचे संघटन तळागाळापासून ते वरिष्ठ स्तरापर्यंत प्रचंड काम करते. या निवडणुकीत मला सहकार्य करणारे पक्षाचे सर्व नेते, आमदार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मी मनापासून आभार मानतो. सर्वांनी एकत्रितपणे ही निवडणूक लढवली, त्यामुळेच आम्हाला अपेक्षित मते मिळाल्याची ग्वाही त्यांनी दिली.
आमच्याकडे कोटा पूर्ण करणारी मते असतानाही आमचा पराभव झाला. सुमारे नऊ हजार मते बाद झाली. दुसऱ्या पसंतीची नऊ हजारांहून अधिक मतेही अवैध ठरली होती. अन्यथा, कोटा पूर्ण करून पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारेच आम्ही विजयी झाले असतो. निवडणुकीच्या नियोजनात कोणतीही चूक झाली नाही. मात्र, दुसऱ्या पसंतीचे मत नोंदवताना मतदारांकडून कुठेतरी चूक झाली असावी, असे मला वाटते. पदवीधर मतदारांमध्ये मतदान प्रक्रियेबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला असावा, त्यामुळे मतदान करताना प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. लोकशाहीची अशा प्रकारे थट्टा होऊ नये, पदवीधर मतदारांना मी हात जोडून विनंती करतो की, भविष्यात अशी चूक होऊ देऊ नका. प्रत्येक मत महत्त्वाचे असते. लोकशाहीत विकास घडवण्यासाठी प्रत्येक मताची भूमिका महत्त्वाची असते.
नागपुरात सर्व मित्रपक्षांनी आम्हाला सहकार्य केले, सर्व पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते यांनी एकत्रितपणे मेहनत घेऊन ही निवडणूक लढवली. सर्व नेत्यांनी आपआपल्या परीने माझ्या प्रचारासाठी सभा घेतल्या. प्रफुल्ल पटेल, आशिष जयस्वाल यांच्यासह इतर नेत्यांनीही मोठी मेहनत घेतली. नागपूर विभागात अशा प्रकारची परिस्थिती अन्यत्र कुठेही घडली नाही, म्हणाले.
दुसऱ्यांच्या मतांवर वंजारींचा विजय
काही गोष्टी देवावर सोडून द्याव्या लागतात. दुसऱ्या पसंतीची इतकी मते बाद होतील, असे मला वाटले नव्हते. ही मोठी चूक आहे. याबाबत आम्ही निश्चितच चिंतन आणि आत्मपरीक्षण करू. काँग्रेसच्या विजयाबाबत बोलायचे झाल्यास, या निवडणुकीचे विश्लेषण केले तर काँग्रेसचा उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये विजयापासून खूप दूर होता. बाद झालेली मते आणि मला मिळालेली मते यांचा एकत्रित विचार केला, तर आम्ही केव्हाही पुढे होतो. काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्यांच्या मतांच्या भरवशावर विजयी झाला आहे.












