रोषणाईसाठी झाडांचा वापर, बड्या ज्वेलर्सकडून पर्यावरण नियमांची पायमल्ली
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : दीपावलीचा सण म्हटला की खरेदी, आकर्षक सजावट आणि रोषणाईचा झगमगाट ओघाने आलाच. गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकजण आपल्या परीने दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी खरेदीला प्राधान्य देतो. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी छोटे-मोठे व्यावसायिक आपापल्या प्रतिष्ठानांची आकर्षक सजावट करतात. विशेषतः सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान रत्नांची विक्री करणाऱ्या बड्या ज्वेलर्समध्ये या काळात रोषणाईची मोठी स्पर्धा पाहायला मिळते. करोडोंची राशीरतले आणि चमकदार खडे विकून ग्राहकांचे भविष्य उज्ज्वल करण्याचे दावे करणाऱ्या याच व्यावसायिकांडून मात्र निसर्गाच्या भविष्यावरच घाला घातला जात असल्याचे विदारक चित्र पश्चिम नागपुरात दिसून येत आहे.
सध्या नागपूर शहरातील अनेक ज्वेलर्सच्या दुकानांसमोरील फूटपाथवर असलेल्या मोठमोठ्या हिरव्यागार वृक्षांना विद्युत दिव्यांच्या माळांनी अक्षरशः गुंडाळण्यात आले आहे. सायंकाळ होताच या झाडांवर केलेली रोषणाईमुळे परिसर उजळून निघतो. ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी केलेली ही सजावट वरकरणी आकर्षक वाटत असली, तरी तिची किंमत शहरातील मौल्यवान वृक्षांना मोजावी लागत आहे. विशेषतः पश्चिम नागपुरातील काही बड्या ज्वेलर्सकडून अशा प्रकारे सार्वजनिक जागेवरील झाडांचा वापर रोषणाई करून जाहिरातीच्या आणि व्यावसायिकते करिता केला जात असल्याचे चित्र आहे.
…अन्यथा हरित क्रांती केवळ कागदावरच
नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने, वृक्ष प्राधिकरणने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी पश्चिम नागपुरासह संपूर्ण शहरात अशा प्रकारांची तातडीने पाहणी करावी. झाडांवर लावलेल्या अनधिकृत विद्युत माळा काढून घेण्याचे निर्देश द्यावेत आणि नियमभंग करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी. अन्यथा हरित नागपूरच्या घोषणा केवळ कागदावरच राहतील.
प्रश्न केवळ रोषणाईचा नाही, तर सार्वजनिक मालमत्ता आणि पर्यावरणाच्या संरक्षणाचा आहे. रस्त्याच्या कडेला किंवा फूटपाथवर उभे असलेले वृक्ष हे कोणत्याचे व्यावसायिक मालकीचे नसतात. ते शहराचे नैसर्गिक वैभव आणि नागरिकांची सामूहिक संपत्ती आहेत.















