नागपूरमधील रामटेक येथे दत्त मेघे फाऊंडेशनच्या कृषी व पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : हवामानाचे सर्वाधिक परिणाम शेती क्षेत्रावर होत असून, अनियमित पाऊस आणि पाण्याच्या कमतरतेमुळे शेतीसमोर नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी संशोधन, कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती, नवाचार आणि नवीन नाविन्यता गरजेचे आहे. कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे तंत्रज्ञान, हवामानाचा ताण सहन करणारी पिके आणि आधुनिक कृषी संशोधनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. उत्तम कृषी महाविद्यालयाची निर्मिती होणेही आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
रामटेक तालुक्यातील कवडस येथे श्री दत्ता मेघे फाऊंडेशन नागपूरद्वारा संचालित स्व. दत्ता मेघे स्मृती दालन, नंदकिशोर जयसवाल कृषी महाविद्यालय आणि शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय रुग्णालयाचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण, आरोग्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, यंदा अल निनोचा प्रभाव आणि पावसामुळे निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थितीचा मोठा फटका पिकांना बसला. त्यामुळे हवामानाचा ताण सहन करणारी आणि कमी पाण्यातही चांगले उत्पादन देणारी पिके विकसित करणे गरजेचे आहे. कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून त्याचा प्रत्यक्ष शेतीमध्ये उपयोग झाला पाहिजे. कृषी क्षेत्रात वैज्ञानिक संशोधन आणि त्याच्या उपयोोजनाची सर्वाधिक आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
मेघे फाऊंडेशनच्या माध्यमातून रामटेकमध्ये उभारण्यात आलेले हे दोन्ही शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम ग्रामीण भागातील कृषी संशोधन, पशुसंवर्धन आणि रोजगारनिर्मितीला चालना देणारे ठरतील. रामटेकच्या विकासासाठी या संस्था महत्त्वपूर्ण योगदान देतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पशुपालन कास्तकारांसाठी मोठा आधार
शेतीसोबतच पशुपालन हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आधार आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन महत्त्वाचे आहे. देशी गाई केवळ दूध उत्पादनासाठी महत्त्वाच्या नसून संपूर्ण कृषी परिसंसस्थेमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे देशी गोवंशचे संवर्धन, पशुनासाठी आधुनिक उपचार पद्धती आणि संशोधनाच्या माध्यमातून पशुपालकांना अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. अत्याधुनिक पशुवैद्यकीय सुविधांच्या माध्यमातून या क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
















