लोकवाहिनी न्यूज
नागपूर : ज्याप्रमाणे टेस्ट ट्यूब बेबीचे तंत्रज्ञान विकसित झाले, त्याचप्रमाणे आता ‘टेस्ट ट्यूब गाय’ अर्थात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गाईंच्या प्रजननचा प्रयोग केला जाणार आहे. देशी गाईंचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. रामटेक येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी गडकरी म्हणाले की, विदर्भात मदर डेअरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. नागपुरातून मदर डेअरी दररोज दहा लाख लीटर दूध संकलित करीत आहे. मात्र, कोल्हापूरमध्ये जेवढे दूध उत्पादन होते, तेवढे उत्पादन संपूर्ण विदर्भातही होत नाही, याची खंत वाटते. त्यामुळे येथे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी मदर डेअरीबरोबरच व्हेटरनरी कॉलेजनेही पुढाकार घेऊन आपण एम्ब्रियो ट्रान्सफरसारखा यशस्वी प्रयोग केला. १९५२ साली आपल्या देशातील गीर जातीची गाय ही ब्राझिला गेली. त्यानंतर तिथल्या लोकांनी ही गाय विकसित केल्यानंतर तिने ६० लीटर दूध दिले. तिचा जो सांड तयार झाला त्याचे वीर्य काढून ते आपल्या गाईंना केल्यानंतर असे लक्षात आले की, ते दिल्यामुळे दोन लीटरच्या गाईला १२ ते १५ लीटरची गोव्ही झाली. आता तर तंत्रज्ञान इतके बदलले आहे की, जसं टेस्टट्यूब बेबी आहे तसे टेस्टट्यूब गोव्हीची सुरवात झाली.
आपल्या विदर्भात मदर डेअरी आली पण आपली देशी गाय ही दोन ते तीन लीटरच्यावर दूध देत नसल्याने त्याला आर्थिक गणित बसत नाही. त्यामुळे त्या गाईला आपण जर निश्चितपणे एम्ब्रियो ट्रान्सफर करून विकसित तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवीन गोव्ही तयार झाली तर विदर्भातही देशी गाय १५-२० लीटर दूध देऊ शकतील. आपल्याकडे एम्ब्रियो ट्रान्सफरसाठी जी प्रयोगशाला लागते त्याला डेढ़ ते दोन कोटी रुपये खर्च येतो. आपल्या राज्यात अशा तीनच प्रयोगशाला आहेत. यामध्ये सांगलीत चितळेंची आहे, बारामतीत शरद पवारांनी निर्माण केलेली आहे आणि आपण व्हेटर्नरी कॉलेजमध्ये सुरू केलेली तिसरी आहे. याच्या मदतीने जोपर्यंत विदर्भात आपण १२ ते १५ लीटर दूध देणाऱ्या देशी गाई विकसित करणार नाही तोपर्यंत आपल्या दुधाचे उत्पादन वाढू शकणार नाही. त्यामुळे एम्ब्रियो ट्रान्सफर करणाऱ्या ज्या प्रयोगशाला आहेत त्या आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्यात किमान एकतरी असायला हवी. त्यामुळे आपल्या देशी गाईंचे उत्पादन वाढणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नेपिअर ग्रास लावण्याचा देखील प्रयोग मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. त्यामुळे विदर्भात दुग्ध उत्पादनाचे जे स्वप्न आहे ते मदर डेअरीच्या रूपानं नक्कीच पूर्ण होणार आहे, असेही यावेळी नितीन गडकरी यांनी सांगितले. या पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या माध्यमातून आणि मदर डेअरीच्या पुढाकारातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे.
प्रकल्प निश्चितच यशस्वी होईल
मोहन भागवत हे स्वतः पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत आणि त्यांच्या हस्ते या प्रकल्पाचा उद्घाटन होत आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा प्रकल्प निश्चितच यशस्वी होईल, याची मला खात्री आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत.

















