कडक कारवाईसाठी मनपा सज्ज
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : हिवाळी अधिवेशनासाठी उपराजधानी नागपुरात येणाऱ्या मंत्री आणि नेत्यांच्या स्वागतासाठी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये ठिकठिकाणी अवैधपणे पोस्टर्स, बॅनर्स लावण्याची स्पर्धा असते। पण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विनापरवानगी पोस्टर्स, बॅनर्स लावणे कायद्याने गुन्हा मानला जातो। तरीही उच्च न्यायालयाच्याच आदेशाला बगल देत ठिकठिकाणी भले मोठाले बॅनर्स झळकताना आपल्याला दिसून येते। मात्र आता उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार, नागपूर शहर स्वच्छ, सुंदर आणि सुव्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेने अनधिकृत आकाशचिन्हे, जाहिरात फलक, बॅनर, कट-आउट, पोस्टर्स, स्वागतद्वार, तोरणे आणि पताका प्रदर्शित करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत दिले आहे।
विशेष म्हणजे, राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२६ पासून नागपुरात सुरू होत आहे। नागरिक, विविध संस्था, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक व व्यावसायिक संघटनांनी सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक लावू नयेत, तसेच अनधिकृत जाहिरातीबाबत मनपाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.nmcnagpur.gov.in तक्रार नोंदवावी, असे आवाहन मनपाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी केले आहे।
नागपूर महानगरपालिका क्षेत्रात सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी परवानगीशिवाय आकाशचिन्हे, बॅनर, कट-आउट, तोरणे अथवा जाहिरात फलक उभारणे कायद्याने प्रतिबंधित आहे। अशा अनधिकृत जाहिरात फलकांवर संबंधित व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष किंवा ज्यांच्यासाठी जाहिरात प्रदर्शित करण्यात आली आहे, त्यांची जबाबदारी निश्चित करून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका क्रमांक १५५/२०११ मधील आदेश तसेच नागपूर खंडपीठातील अवमान याचिका क्रमांक २६६/२०१० व २५६/२०१० मधील आदेशांचे पालन करणे बंधनकारक आहे। या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध न्यायालयीन आदेशांचा अवमान केल्याप्रकरणी तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २४५, महाराष्ट्र महानगरपालिका (आकाशचिन्हे (स्काय साईन) व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण) नियम, २०२२ आणि महाराष्ट्र मालमत्तेचे विद्रूपीकरण प्रतिबंधक अधिनियम, १९९५ मधील तरतुदींनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे।
विशेषतः हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत शहरात मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिकांची ये-जा असते। त्यामुळे शहरातील रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसर स्वच्छ व सुंदर राहणे आवश्यक आहे। सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण होऊ नये, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये आणि शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचू नये, यासाठी मनपाने विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे।
रस्ते, पदपथ, विद्युत खांब, वाहतूक सिग्नल, ट्रॅफिक आयलँड, मेट्रोचे पिलर्स तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी परवानगीशिवाय जाहिरात फलक, बॅनर, पोस्टर्स, कट-आउट, स्वागतद्वार अथवा पताका लावू नयेत। जाहिरात प्रदर्शित करायची असल्यास मनपाने अधिकृतरीत्या परवानगी दिलेल्या जाहिरात फलकांवरच ती प्रदर्शित करावी। अनधिकृत जाहिरात फलक आढळून आल्यास ते हटविण्यासह संबंधितांवर न्यायालयीन आदेश आणि प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल।
शहरातील अनधिकृत आकाशचिन्हे आणि जाहिरात फलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे। नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.nmcnagpur.gov.in/ तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे। तसेच संकेतस्थळावर संबंधित झोनचे नोडल अधिकारी, सहायक आयुक्त आणि वॉर्ड अधिकारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत। नागरिकांनी आपल्या परिसरातील अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर किंवा अन्य आकाशचिन्हे निदर्शनास आल्यास संबंधित झोन सहायक आयुक्तांकडे तक्रार नोंदवावी।















