लोकवाहिनी न्यूज तिरुपती : येथील भगवान व्यंकटेश्वराचे कोट्यवधी भक्त आहेत. हे भक्त देवाच्या चरणी हजारो लाखांमध्ये दान करत असतात. दान देण्याची ही शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे. आता या भक्तांमध्ये चेन्नईच्या जैन दाम्पत्याने देवाप्रती असलेली भक्ती आणि श्रद्धेचा एक अद्वितीय नमुना सादर करत, भगवान व्यंकटेश्वराला १२१ किलो सोने अर्पण केले. गुरुवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत हे दान अर्पण करण्यात आले. या सोन्याची किंमत सुमारे २०६ कोटी रुपये आहे.
वर्धमान आणि राधिका जैन या दाम्पत्याने तिरुमला तिरुपती देवस्थानमचे पुजारी आणि प्रतिनिधींकडे हे मौल्यवान दागिने औपचारिकपणे सुपूर्द केले. अर्पण केलेल्या वस्तूंमध्ये हिरेजडित सोन्याच्या दागिन्यांचा समावेश असून, मंदिराच्या इतिहासातील ही सर्वात लक्षणीय देणगी ठरली आहे. या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री नायडू यांनी देणगीदार दाम्पत्याचे आभार मानले. भगवान व्यंकटेश्वराला २०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने अर्पण करणे ही एक असामान्य गोष्ट आहे. देवावरील अपार भक्ती आणि श्रद्धेपोटी हे जैन दाम्पत्य या देणगीसाठी पुढे आले आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले, याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो, असे ते म्हणाले. नायडू यांनी सांगितले की, दैवी प्रेरणेतून आपण ही देणगी देत असल्याचे या दाम्पत्याने त्यांना सांगितले. तिरुमला हे श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक समाधानाचे प्रतीक असल्याचे नमूद करत, श्री कृष्णदेवरायांच्या काळापासून ते आजच्या पिढीपर्यंत भक्तांची ही अखंड श्रद्धा कायम राहिल्याचे ते म्हणाले.
















