पुण्यतिथी महोत्सवास उत्साहात प्रारंभ
लोकवाहिनी न्यूज नागपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही प. पू. श्री प्रह्लाद महाराज (रामदासी) यांचा पुण्यतिथी महोत्सव नागपुरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. या महोत्सवास गुरुवार, १२ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला असून, शनिवार, १४ नोव्हेंबरला त्याची सांगता होणार आहे.
शुक्रवारी प. पू. सद्गुरू श्री प्रह्लाद महाराज उपासना केंद्रातर्फे महाराजांची भव्य पालखी काढण्यात आली. तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पालखीच्या स्वागतासाठी भक्तांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. पुण्यतिथी महोत्सवानिमित्त १३, समर्पित, दंडिगे ले-आऊट शंकरनगर (पूर्व) येथे गेल्या दोन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. भक्तांनी काकड आरती, नामजप, भजन, उपासना, शेजारती, गोपालकाला व कुरवंडी इत्यादी कार्यक्रमात सहभाग घेतला आणि मोहनबुवा कुबेर यांच्या गुलालच्या कीर्तनाचाही आस्वाद् घेतला. यादरम्यान् सामूहिक जप, पवमान अभिषेक, विष्णुसहस्रनाम, नैवेद्य आणि महाप्रसादाचेही आयोजन केले गेले.
शनिवार, १४ नोव्हेंबरला सकाळी ५.४५ काकड आरती व कुरवंडी, ७.३० वाजता गोपालकाला होणार असून, त्यानंतर महोत्सवाचा समारोप होईल. महोत्सवाच्या सांगता सोहळ्यातील कार्यक्रमांना मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्रीमहाराजांचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन आयोजन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

















