एशियन पैरा गेम्समध्ये डिस्क थ्रो स्पर्धेत पटकावले पदक
लोकवाहिनी न्यूज नागपूर : जपानमधील आइची-नागोया येथे आयोजित एशियन पैरा गेम्स २०२६ मध्ये महिलांच्या F54 डिस्क थ्रो स्पर्धेत १५.६६ मीटर अंतराची नोंद करीत सुवर्णपदक पटकावणाऱ्या नागपूरच्या आंतरराष्ट्रीय पैरा अॅथलीट सुवर्णा वानखेडे राज यांचा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या नागपूर येथील जळतळा स्थित निवासस्थानी जाऊन सत्कार केला.
यावेळी सुवर्णा यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करून अनिल देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. सुवर्णा यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला असून, त्यांच्या यशामुळे नागपूर आणि विदर्भाच्या शिरपेचारात मानाचा तुरा रोवला गेला आहे, असे मतही अनिल देशमुख यांनी यावेळीव्यक्त केले.
सुवर्णा वानखेडे राज या केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशस्वी पैरा अॅथलीट नसून, दिव्यांग व्यक्तींच्या हक्कासाठी आणि त्यांच्यासाठी सुलभ व समावेशक वातावरण निर्माण करण्यासाठीही कार्यरत आहेत. त्यांना २०१४ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय रोल मॉडल पुरस्कार, २०१५ मध्ये राष्ट्रीय युवा पुरस्कार तसेच २०२४ मध्ये संयुक्त राष्ट्रचा अंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला आहे. देशभरातील सार्वजनिक इमारती, वाहतूक व्यवस्था आणि पादचारी सुविधांच्या सुगम्यता तपासणीमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
त्यांच्या या यशामुळे दिव्यांग व्यक्तींमधील क्रीडा कौशल्य आणि क्षमता अधोरेखित झाली असून, अनेक तरुणांसाठी त्या प्रेरणास्थान ठरल्या आहेत. सुवर्णा यांची ही कामगिरी केवळ क्रीडा क्षेत्रापुरती मर्यादित नसून संघर्ष, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते, याचे उदाहरण असल्याचे अनिल देशमुख म्हणाले. यावेळी सुवर्णा यांचे वडील हिरामण वानखेडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नागपूर शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, अविनाश गोतमारे, रमण पेठे, इंद्रनिल बोबडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

















