पंतप्रधान मोदींच्या उपक्रमाचाही गौरव !
लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी मॉस्को येथे आयोजित ‘एआय जर्नी २०२६’ या परिषदेदरम्यान १६ वर्षीय भारतीय उद्योजक राउल जॉन अजू यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षेत्रात अजू करत असलेल्या कामाची प्रशंसा करताना पुतिन यांनी त्याचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाशी जोडला.
वृत्तानुसार, परिषदेदरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष कासिम-जोमार्ट तोकायेव यांनी युवा नवोन्मेषकांशी संवाद साधला. यावेळी एआय रिअल्म टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) राउल जॉन अजू यांची पुतिन यांच्याशी ओळख करून देण्यात आली. या संवादादरम्यान पुतिन यांनी अजू यांच्या कामाचे कौतुक केले.
पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स
वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी अजूला तंत्रज्ञानाची आवड निर्माण झाली. स्वतःहून शिकणे आणि विविध प्रयोग करणे या माध्यमातून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे एआय प्रकल्प, शैक्षणिक उपक्रम आणि मोठ्या ऑनलाईन समुदायापर्यंत पोहोचला. अजू यांनी नॉर्थ एडपल्ली येथील जीएचएसएस शाळेतून बारावीचे वाणिज्य शाखेतील शिक्षण पूर्ण करतानाच एआय प्रकल्पांवर काम सुरू ठेवले. एआय रिअल्म टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून ते विविध एआय उत्पादने आणि व्यावहारिक तांत्रिक उपाय विकसित करतात. त्यांच्या प्रमुख प्रकल्पांमध्ये थिंकक्राफ्ट, रेस्क्यू एआय आणि मीबॉट यांसारख्या साधनांचा समावेश आहे. याशिवाय, ते थिंकक्राफ्ट अकादमीशीही संबंधित आहेत.
या माध्यमातून विद्यार्थी आणि व्यावसायिकांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जाते. सॉफ्टवेअर विकसित करण्याबरोबरच तांत्रिक पार्श्वभूमी नसलेल्या लोकांनाही एआय तंत्रज्ञान सहज समजावे आणि त्याचा वापर करता यावा, यासाठी अजू यांनी अनेक कार्यशाळांचे आयोजन केले आहे. आतापर्यंत त्यांनी आठ टेडएक्स व्याख्याने दिली आहेत. आयआयटी, विविध विद्यापीठे आणि शाळांमध्येही त्यांनी मार्गदर्शनपर सत्रे घेतली आहेत. त्यांच्या या कार्यामुळे सोशल मीडियावर त्यांचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत.














