बॉलीवुड अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मुलगा आर्यन खान याने मनोरंजन क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. आर्यनला ‘टाइम १०० नेक्स्ट इंडिया’च्या पहिल्या मुखपृष्ठावर स्थान मिळाले आहे. त्याच्यासोबत चित्रपट दिग्दर्शिका पायल कपाडिया आणि तेजा रिओ यांचाही या मुखपृष्ठावर समावेश करण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत नव्या पद्धतीने कथा मांडणाऱ्या आणि मनोरंजन क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या व्यक्ती म्हणून या तिघांचा गौरव करण्यात आला आहे.
आर्यन खानने नेटफ्लिक्सवरील ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या मालिकेतून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. सप्टेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सात भागांच्या मालिकेत बॉलीवूडमधील स्पर्धा, प्रसिद्धी, कलाकारांचे आयुष्य आणि चित्रपटसृष्टीतील राजकारण यांवर विनोदी पद्धतीने भाष्य करण्यात आले आहे. या मालिकेचे लेखन आणि दिग्दर्शन आर्यनने केले असून, तिची निर्मिती शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटने केली आहे. या मालिकेत लक्ष्य, राघव जुयाल, सहेर बंबा, बॉबी देओल, अन्या सिंग आणि मोना सिंग यांच्यासह अनेक कलाकारांनी काम केले आहे. एका नवोदित कलाकाराचा चित्रपटसृष्टीतील संघर्ष आणि प्रसिद्धी मिळवण्याचा प्रवास या मालिकेत दाखवण्यात आला आहे.
आर्यनच्या वेगळ्या दिग्दर्शनशैलीचेही कौतुक करण्यात आले आहे. दरम्यान, पायल कपाडिया यांनी ‘ऑल वी इमॅजिन अँज लाईट’ या चित्रपटातून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवली. २०२४ मध्ये कान्स चित्रपट महोत्सवात त्यांच्या चित्रपटाला ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळाला होता. तर तेजा रिओ यांच्या ‘आंग’ या पहिल्याच चित्रपटाची टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दखल घेण्यात आली होती. ‘टाइम१०० नेक्स्ट इंडिया’च्या पहिल्या यादीत विविध क्षेत्रांतील १०० प्रभावशाली व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट, स्कायरूटचे सीईओ पवन कुमार चंदना आणि उद्योगपती आदर पूनावाला यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. नव्या पिढीतील नेतृत्व, कल्पकता आणि कामगिरीला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.













