बाळासाहेबांच्या फोटो वादावर शायनाचा पडदा
लोकवाहिनी न्यूज
मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फाडल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर, आपल्या कृतीमुळे शिवसैनिकांच्या किंवा बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मनापासून माफी मागते. अशी दिलगिरी शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट करत व्यक्त केली. मात्र, आपल्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच बाळासाहेबांवरील प्रेम आणि निष्ठा सिद्ध करण्यासाठी कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध करण्यासाठी बुधवारी मुंबईत शायना एनसी यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी अनावधानाने त्यांच्या हातून बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फाडले गेल्याचा आरोप झाला. या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आणि ठाकरे गटाकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली. या प्रकरणाची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शायना एनसी यांना भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर आता शायना यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या जुन्या संबंधांची आठवण सांगितली. बाळासाहेब हे आपल्या आयुष्यातील पितृतुल्य आणि देवतुल्य व्यक्तिमत्त्व असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लहानपणी पहिल्यांदा बाळासाहेबांची भेट झाली होती. ते आपल्या वडिलांचे जवळचे मित्र होते आणि त्यांच्या कुटुंबाशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.













