दुष्काळाच्या अंधारात फराळाचा गोडवा!; शेतकरी, शेतमजुरांना फराळ किटचे वाटप
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा सण. मात्र, राज्यातील अनेक भागांत दुष्काळाचे सावट असताना शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबांसाठी यंदाची दिवाळी आर्थिक अडचणींमुळे काहीशी निराशाजनक ठरण्याची शक्यता होती. अशा परिस्थितीत समाजातील या घटकांच्या घरातही दिवाळीचा गोडवा पोहोचावा, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा आणि त्यांनाही सणाचा आनंद घेता यावा, या सामाजिक जाणिवेतून कॉन्ट्रैक्टर ॲण्ड बिल्डर असोसिएशन ऑफ विदर्भ-महाराष्ट्र यांच्या वतीने एक हजार शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना आकर्षक फराळ किटचे वाटप करण्यात आले. केवळ मदत म्हणून नव्हे, तर सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण महाजन यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला. विशेष म्हणजे, फराळ किटचे वाटप करताना केवळ शहरालगतच्या किंवा सहज पोहोचता येणाऱ्या गावांची निवड न करता विदर्भ्यातील दुर्गम, आदिवासी आणि अवर्षणग्रस्त भागांतील गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील आदिवासी भाग, कळमना परिसरातील काही भाग, अकोला जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त गावे, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुका, गोसीखुर्द परिसरातील शेतमजूर कुटुंबे तसेच मेळघाटातील अतिदुर्गम भागात या फराळ किट पोहोचविण्यात आल्या.
या उपक्रमातील सर्वाधिक संवेदनशील बाब म्हणजे मेळघाटातील अशा दुर्गम वस्त्यांपर्यंत असोसिएशनचे पदाधिकारी पोहोचले, जिथे आजही वीजेची पुरेशी व्यवस्था नाही. आधुनिक विकासाच्या अनेक सुविधा अद्याप पोहोचू न शकलेल्या या भागातील कुटुंबांच्या घरांपर्यंत दिवाळीचा फराळ पोहोचविणे हे या उपक्रमाचे खरे वैशिष्ट्य ठरले. मदत घेण्यासाठी गरजू व्यक्तींनी कुठे यावे, याची वाट न पाहता मदतच त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याची भूमिका असोसिएशनने घेतली.
या फराळ किटमध्ये दिवाळीच्या पारंपरिक फराळातील विविध पदार्थांचा समावेश करण्यात आला होता. शेव, चिवडा, बुंदी, करंजी, लाडू, शंकरपाळे, खारे-गोड पदार्थ, अनारसे आदी पदार्थांचे आकर्षक पॅकिंग करून प्रत्येक किट तयार करण्यात आली होती. एक हजार कुटुंबांसाठी तयार करण्यात आलेल्या या किट केवळ औपचारिक वाटपापुरत्या मर्यादित न ठेवता पदाधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्या शेतकरी आणि शेतमजूर बांधवांच्या हातात दिल्या. त्यामुळे या उपक्रमाला अधिक आपुलकीचे स्वरूप प्राप्त झाले.
या उपक्रमासाठी असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्यांनी विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष प्रवास करून दुर्गम भागातील गावांपर्यंत पोहोचण्याची मेहनत घेतली. मोरेश्वर ढोबले, दीपक मगरे, पीयूष मुसले, गुरुवा रेड्डी, प्रणब चोखानी, पी. आर. पाटिल, संजय खैरनार, तेजस वानखेडे, राजाभाऊ राऊत, प्रतीक कुंभार, पीयूष पन्हाले, निहार खेडकर, राजू गोलीवार, बालासाहेब चाफले, उमेश असाटी, अरुण बोधे, अखिल अहमद, मोहन नायर, बी. सी. के. नायर, संजय शर्मा आदी सदस्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडत फराळ किट गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
आज महाराष्ट्रातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या अनिश्चिततेचे, पिकांच्या नुकसानीचा आणि आर्थिक संकटाचा सामना शेतकरी करीत आहेत. शेतमजुरांच्या हाताला काम मिळण्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे. अशावेळी सणासुदीचा आनंद साजरा करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टीही अनेक कुटुंबांसाठी आर्थिकदृष्ट्या कठीण ठरतात. दिवाळीच्या काळात घरात फराळ असावा, मुलांच्या चेहऱ्यावर आनंद असावा, या साध्या अपेक्षाही काही कुटुंबांसाठी अपुऱ्या राहतात. हीच परिस्थिती लक्षात घेऊन असोसिएशनने पुढाकार घेतला.
या उपक्रमामागे एक महत्त्वाचा सामाजिक संदेशही दडलेला आहे. समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या क्षमतानुसार गरजू व्यक्तींच्या आनंदात सहभागी व्हावे. मदत ही नेहमी मोठ्या आर्थिक स्वरूपातच असावी असे नाही. आपल्या परीने केलेली छोटीशी मदतही दुसऱ्याच्या आयुष्यात मोठा आनंद निर्माण करू शकते. ‘फुल ना फुलाची पाкळी’ या भावनाेतून असोसिएशनने हा उपक्रम राबवला. फराळाच्या किटची किंमत किती, यापेक्षा ती योग्यवेळी योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचली, याचे समाधान अधिक महत्त्वाचे असण्याची भावना या उपक्रमातून व्यक्त झाली.
कॉन्ट्रैक्टर आणि बिल्डर क्षेत्रातील व्यावसायिक सामान्यतः विकासकामे, बांधकामे आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीशी जोडलेले असतात. मात्र, समाजाच्या विकासात सामाजिक बांधिलकीही तितकीच महत्त्वाची आहे, याची जाणीव असोसिएशनने या उपка्रमातून करून दिली. या अगोदर असोसिएशनने कोविडच्या काळात आठशे रुग्णांची निस्वार्थ सेवा केल्याची नोंद समाजाने घेतलेली आहे. असोसिएशन नेहमीच महाराष्ट्रातील विपरीत परिस्थितीत शासन व प्रशासनासोबत नेहमीच उभे राहते, याची अनेक उदाहरणे सांगता येतील. समाजाने आपल्याला जे दिले, त्यातील काही भाग समाजातील गरजू घटकांसाठी परत देण्याची भावना प्रत्येक व्यावसायिकाने जपली पाहिजे, हा विचार या उपक्रमातून अधोरेखित झाला.
‘एक हात मदतीचा नव्हे, कर्त्यव्याचा’ ही भावना प्रत्यक्ष कृतीत उतरवणाऱ्या कॉन्ट्रैक्टर ॲण्ड बिल्डर असोसिएशन ऑफ विदर्भ-महाराष्ट्राचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. हा आदर्श सर्वांनी द्यावा अशी सुद्धा भावना काही लोकांनी बोलून दाखवली.
















