लोकवाहिनी न्यूज:मुंबई : कोणत्याही प्रकारच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊन अतिरिक्त इंधन साठवून ठेवू नये. गरज असेल तेव्हाच इंधन खरेदी करावे, असे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर, माध्यमांशी बोलताना केले.
राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्धतेबाबत गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या चर्चांमुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गामध्ये संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे. काही ठिकाणी पेट्रोल पंपावर अचानक गर्दी वाढल्याने रांगा लागल्याची चित्रे समोर आली असून, तर काही भागांमध्ये इंधन टंचाईची चर्चा जोर धरू लागली आहे. मात्र राज्य प्रशासनाने आणि कृषी विभागाने या सर्व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर, माध्यमांशी बोलताना राज्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊन अतिरिक्त इंधन साठवून ठेवू नये. गरज असेल तेव्हाच इंधन खरेदी करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच हवामानाबाबत बोलताना त्यांनी पांडुरंगाकडे राज्यात समाधानकारक पाऊस पडावा अशी प्रार्थना केल्याचे सांगितले.
दरम्यान, काही जिल्ह्यांमध्ये मात्र परिस्थिती वेगळी दिसून आली. परभणी परिसरात पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने वाहनधारकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. काही ठिकाणी डिझेल भरण्यावरून वादावादी आणि हातघाईपर्यंत प्रकरणे गेल्याची स्थानिक पातळीवरून समोर आले. शेतकरी वर्गाला शेतीकामांसाठी आवश्यक असलेले डिझेल वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर काही अपप्रवृत्तीनी परिस्थितीचा गैरफायदा घेतल्याचेही आरोप होत आहेत. वाळू वाहतुकीसारख्या काही अनधिकृत व्यवहारांमध्ये इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने सामान्य ग्राहकांना अडचणी निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. काही ठिकाणी इंधन दर अधिक असल्याचेही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे.
दुसरीकडे, जळगाव शहरात निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी काही प्रमुख पेट्रोल पंपाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. इंधन पुरवठा सुरळीत असल्याचे दावा प्रशासनाने केला असून, नागरिकांनी घाबरून गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव प्लास्टिक बाटल्या किंवा कॅनमध्ये इंधन देण्यावर मर्यादा घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात मात्र इंधन टंचाईची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. अनेक पेट्रोल पंपावर ट्रॅक्टर, दुचाकी आणि इतर वाहनांच्या लांब-लांब रांगा दिसून आल्या. या ठिकाणी वादावादी आणि काही ठिकाणी किरकोळ हाणामारीच्या घटनाही घडल्याचे समोर आले आहे. वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही पंप चालकांनी अनोखी पद्धत अवलंबली आहे. मेहकर-चिखली मार्गावरील एका पेट्रोल पंपावर ग्राहकांना इंधनासाठी आधीपासून कूपन प्रणाली सुरू करण्यात आली आहे.









