काँग्रेसच्या डमी उमेदवाराची पोटनिवडणुकीतून माघार
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून दोन उमेदवार रिंगणात उतरल्याने निर्माण झालेली उत्सुकता अखेर संपृष्टात आली असून दिनेश ढोले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता भाजपचे डॉ. राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत होणार आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीत भाजपने माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांना उमेदवारी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ पाहता भाजपची स्थिती मजबूत मानली जात असली तरी काँग्रेसने ही निवडणूक केवळ औपचारिक न ठेवता ती प्रतिष्ठेची करण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसकडून प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पक्षांतर्गत समन्वयाबाबत तसेच रणनीतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. एबी फॉर्मवर अतुल लोंढे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असल्याने तेच अधिकृत उमेदवार ठरणार, अशी शक्यता आधीपासून व्यक्त केली जात होती. मात्र दोन अर्ज दाखल झाल्याने काही काळ संभ्रम निर्माण झाला होता. या घडामोडींमुळे निवडणुकीतील काँग्रेसची रणनीती आणि अंतर्गत समन्वय यावरही राजकीय विश्लेषकांचे लक्ष केंद्रित झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी दिनेश ढोले यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे काँग्रेसकडून अतुल लोंढे हेच अधिकृत उमेदवार म्हणून अंतिम झाले आहेत. भाजपचे डॉ. राजीव पोतदार विरुद्ध काँग्रेसचे अतुल लोंढे असा थेट सामना निश्चित झाला आहे.
भाजपकडे पुरेसे संख्याबळ
या मतदारसंघात महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीतील सुमारे ८३६ लोकप्रतिनिधी मतदार म्हणून मतदान करणार आहेत. या संख्याबळाच्या आधारे भाजपचे पारडे जड मानले जात आहे. तरीही काँग्रेसने ही निवडणूक बिनविरोध होऊ न देता राजकीय संदेश देण्यासाठी प्रतिष्ठेची केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला प्रभाव कायम असल्याचे दाखवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. दुसरीकडे भाजपही आपले संघटनात्मक बळ आणि स्थानिक नेटवर्क वापरून विजय निश्चित करण्याच्या तयारीत आहे.











