माळीण दुर्घटनेवर आधारित मराठी चित्रपट ‘एक होते माळीण’ २४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१४ मधील भीषण दरड दुर्घटनेतील वेदना आणि संघर्ष या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आल्या आहेत. दमदार कलाकार, वास्तववादी कथानक आणि आधुनिक व्हीएफएक्समुळे हा चित्रपट चर्चेत आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात ३० जुलै २०१४ रोजी एक भीषण दुर्घटना घडली होती. मुसळधार पावसामुळे गावावर मोठी दरड कोसळली आणि काही क्षणांत संपूर्ण गाव मातीखाली गाडले गेले. या दुर्घटनेत १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. याच सत्य घटनेवर आधारित ‘एक होते माळीण’ हा मराठी चित्रपट आता २४ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून माळीण दुर्घटनेची वेदना, संघर्ष आणि त्या काळातील परिस्थिती प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे. चित्रपटाचे पोस्टर आणि मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाची निर्मिती संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी केली आहे.
रुपेश राणे, अरुण कोंजे, दत्ता गायकर आणि राजू राणे हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, संकल्पना आणि पटकथा राजू राणे यांनी तयार केली असून दत्तात्रय गायकर आणि राजू राणे यांनी लेखन, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटात प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, अक्षय म्हात्रे, दीपज्योती नाईक आणि अनुज ठाकरे यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाचे छायांकन राजा फडतरे यांनी केले असून, संगीत आणि गीतांची जबाबदारी युवराज गोंगले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी आणि हरिदास शिंदे यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. या चित्रपटाचे विशेष आकर्षण म्हणजे अत्याधुनिक व्हीएफएक्स, माळीण गावाचा उभारलेला भव्य सेट आणि प्रभावी कथा. चित्रपट अधिक वास्तववादी वाटावा यासाठी राजू राणे यांनी माळीण गावातील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून माहिती गोळा केली आणि त्यावर आधारित कथानक तयार केले. हृदयाला स्पर्श करणारी कथा, दमदार कलाकार, उत्कृष्ट संगीत आणि प्रभावी तांत्रिक बाजू यामुळे ‘एक होते माळीण’ हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा आणि भावनिक अनुभव देणार आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला हा चित्रपट आता २४ जुलै रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.









