पनवेलमध्ये आयडियल सेंटरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
लोकवाहिनी न्यूज
पनवेल : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये होत असलेल्या सकारात्मक बदलांमुळे विद्यार्थ्यांचा ओढा पुन्हा सरकारी शाळांकडे वाढताना दिसत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण अधिक परिणामकारक करण्यावर सरकारचा भर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल येथील आयडियल सेंटर या अत्याधुनिक डिजिटल शिक्षण केंद्राच्या उद्घाटनावेळी स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी संवाद साधला.
जिल्हा परिषद शाळांमध्ये तंत्रज्ञानाधारित शिक्षणाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पनवेल येथील आयडियल सेंटर या अत्याधुनिक डिजिटल शिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण आणि शासकीय शाळांमधील शिक्षणाचा दर्जा खाजगी शाळांच्या बरोबरीने नेण्याचा सरकारचा उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. पनवेल तालुक्यातील वाहाल येथील पीएम् श्री रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी शालेय प्रवेश महोत्सव २०१६ निमित्त या विशेष डिजिटल लॅबचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी संवाद साधत नवीन शैक्षणिक मॉडेलची माहिती घेतली. या केंद्रामुळे पारंपरिक शिक्षणपद्धतीत मोठा बदल घडणार असल्याचे सांगण्यात आले.
आयडियल सेंटर हे पूर्णतः डिजिटल स्वरूपातील शिक्षण केंद्र असून ते आधुनिक ई-लर्निंग सुविधांनी सुसज्ज आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दृकश्राव्य पद्धतीने अभ्यास करता येणार असून, अध्यापन अधिक सुलभ आणि आकर्षक होणार आहे. या उपक्रमातील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचा संपूर्ण अभ्यासक्रम तीन भाषांमध्ये मराठी, इंग्रजी आणि उर्दू दृकश्राव्य स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना शिक्षण अधिक सोपे होणार आहे. डिजिटल लॅबमध्ये आधुनिक स्मार्ट क्लासरूम सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी २४ संगणक, शिक्षकांसाठी स्वतंत्र संगणक व्यवस्था, ई-डेस्क, ई-पोडियम आणि इंटरॅक्टिव्ह व्हाईटबोर्ड यांसारख्या अत्याधुनिक साधनांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे वर्गातील अध्यापन अधिक संवादात्मक आणि तंत्रज्ञानाधारित होणार आहे. या प्रणालीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ती ९० टक्क्यांपर्यंत ऑफलाईन मोडमध्ये कार्य करू शकते. त्यामुळे इंटरनेट किंवा वीजपुरवठा खंडित झाल्यासही विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबत नाही, ही या प्रकल्पाची मोठी जमेची बाजू मानली जात आहे. याशिवाय डिजिटल परीक्षा प्रणाली, सादरीकरण साधने आणि मूल्यांकनासाठी सॉफ्टवेअर-आधारित यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली असून, यामुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद होण्यास मदत होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये होत असलेल्या सकारात्मक बदलांमुळे विद्यार्थ्यांचा ओढा पुन्हा सरकारी शाळांकडे वाढताना दिसत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण अधिक परिणामकारक करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की, आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता तंत्रज्ञानाशी जोडलेले शिक्षण देणे अत्यावश्यक आहे. या केंद्रामुळे शिक्षकांना अध्यापन सुलभ होईल, तर विद्यार्थ्यांना संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजतील. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांमध्ये घटनात्मक मूल्ये, सामाजिक जाणीव, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि जबाबदारीची भावना रुजवण्यावरही भर दिला. शिक्षणाच्या माध्यमातून जबाबदार आणि सुसंस्कृत नागरिक घडवणे हे राज्य सरकारचे ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. या कार्यक्रमाला स्थानिक आमदार महेश बालदी, माजी खासदार रामशेट ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे रायगड जिल्ह्यातील शैक्षणिक पायाभूत सुविधा नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.









