लोकवाहिनी न्यूज
सोलापूर : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा रोष प्रचंड वाढला असून, माढा व पंढरपूर तालुक्यात मंगळवारी जोरदार आंदोलन केले. शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या मोजणी प्रक्रियेत अडथळा निर्माण केला.
माढ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर शेतकरी संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढला गेला, तर पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे सरकारी अधिकाऱ्यांची मोजणी करण्यासाठी येण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांच्या तीव्र रोषामुळे अडचणीत आली. माढा येथील मोर्चाचे नेतृत्व करणारे शेतकरी नेते संजय पाटील घाटणेकर यांनी सरकारला थेट इशारा दिला. जर आमच्या द्राक्षबागा आणि इतर फळपिकांचा नाश करून शक्तीपीठ महामार्ग लादण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही टोकाचा विरोध करणार आहोत. आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये पाय ठेवू देणार नाही, असा गंभीर इशारा त्यांनी दिला. माढा तहसील कार्यालयाजवळील मोर्च्यात हजारो शेतकरी सहभागी झाले. सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त करत प्रशासनाला कडक शब्दांत चेतावणी दिली. संजय पाटील घाटणेकर यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षित केल्यास आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे स्पष्ट केले.
याच दरम्यान, पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे भू-संपादनासाठी आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा तीव्र विरोध पाहावा लागला. पोलिस बंदोबस्त असूनही शेतकरी रस्त्यावर उतरले आणि अधिकाऱ्यांवर आणि पोलिस फौजफाट्यावर वेढा घालून जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांचा रोष पाहून प्रशासनाला मोजणी न करता परतावे लागले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पूर्वी नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रातून विरोध झाल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्ग बदलण्याचे संकेत दिले होते. मात्र नवीन प्रस्तावित मार्गदेखील काही गावांमधून जात असल्याने शेतकऱ्यांना तीव्र रोष निर्माण झाला आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांवर थेट दबाव निर्माण झाला असून, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे राज्य सरकारसाठी राजकीय आव्हान निर्माण झाले आहे. आता सरकार कोणते निर्णय घेईल, शेतकऱ्यांचा रोष शांत करण्यासाठी काय धोरण आखेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.









