लोकवाहिनी न्यूज
नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवड परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास धावत्या एसटी बसला अचानक भीषण आग लागल्याने महामार्गावर काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. मात्र चालक आणि वाहक यांच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व ५४ प्रवासी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि मोठी दुर्घटना टळली.
ही घटना चांदवड तालुक्यातील खोकड तलाव परिसरातील निसर्ग लॉजिंगच्या समोर घडली. शहादा ते नाशिक या मार्गावर धावणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला (क्रमांक एमएच १५ जेडब्ल्यू ०८९५) अचानक आग लागली. प्रवास सुरळीत सुरु असताना बसमध्ये अचानक धूर आणि जळण्याचा वास येऊ लागल्याने चालकाच्या लक्षात प्रकार आला. काही क्षणांतच आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच चालक आणि वाहक यांनी तातडीने बस महामार्गाच्या कडेला उभी केली. वेळ न दवडता सर्व ५४ प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. यावेळी प्रवाशांमध्ये काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रवासी बाहेर पडत असतानाच, आगीने वेग घेतला आणि काही मिनिटांतच संपूर्ण बसने पेट घेतला. ज्वाळा इतक्या तीव्र होत्या की, काही वेळातच बस पूर्णपणे जळून खाक झाली. घटनेचा थरार पाहून उपस्थित नागरिकही स्तब्ध झाले.
घटनेची माहिती मिळताच चांदवड येथील अग्निशमन दलाचे पथक आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करत, आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर, आग आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. चालक आणि वाहक यांच्या वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे सर्व प्रवासी सुरक्षितपणे बाहेर पडू शकले. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठा अपघात टळला असल्याचे मानले जात आहे. महामार्गावर दुपारच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे मुंबई-आग्रा मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. घटनास्थळी वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.









