मातेचा आक्रोश ; सहा मृत्यूंचे दाखले अधिकाऱ्यांसमोर
लोकवाहिनी न्यूज
गडचिरोली : ‘गावाला रस्ता असता, तर माझी तीन महिन्यांची मुलगी वाचली असती’ आपल्या चिमुकलीला गमावलेल्या चिरेफल्ली येथील रुपाली मनोज आलाम यांनी अधिकाऱ्यांसमोर ही व्यथा मांडली, तेव्हा आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्यांचे डोळे पाणावले. रस्ताअभावी मुलीला वेळेवर उपचार मिळून शकले नाहीत आणि तिचा जीव गेला, या मातेच्या शब्दांतून दुर्गम आदिवासी भागातील मूलभूत सुविधा आणि आरोग्यसेवेचे विदारक वास्तव समोर आले.
अहेरी तालुक्यातील पाच गाड्यांना जोडणाऱ्या सुमारे २२ किलोमीटर रस्त्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या ठिया आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही नागरिकांचा निर्धार कायम आहे. २८ किलोमीटरची पायपीट करून अहेरीत दाखल झालेल्या आदिवासी नागरिकांनी आपल्या मागण्यासाठी आंदोलन सुरू ठेवले आहे. यावेळी केवळ रस्त्याची मागणीच नव्हे, तर रस्ताअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झालेल्या सहा जणांचे मृत्यूचे दाखलेही अधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात आले. गेल्या १४ महिन्यांत रस्ताअभावी रुग्णांना वेळेवर उपचार मिळू न शकल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याचा दावा आंदोलकांनी केला, या मृत्यूंचे दाखले अधिकाऱ्यांसमोर ठेवत नागरिकांनी दुर्गम गावातील परिस्थितीची जाणीव करून दिली. आजारपणात रुग्णालय गाठण्यासाठी रस्ता नसेल तर गर्भवती महिला, लहान मुले आणि गंभीर रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळवणार कशी, असे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. रुपाली आलाम यांनी तीन महिन्यांच्या मुलीला वाचवता आले नाही, ही सल व्यक्त करताना त्यांनी रस्त्याच्या अभावामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना कोणत्या परिस्थितीला सामore जावे लागते, हे मांडले. आंदोलनस्थळी आलेले सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आणि प्रकल्प अधिकारी शिवंश सिंह तसेच प्रभारी अपर जिल्हाधिकारी शुभम पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा केली.
आंदोलनासाठी नागरिक दोन ट्रॅक्टरमधून अन्नधान्य, पाणी आणि मुक्कामासाठी आवश्यक साहित्य घेऊन आले आहेत. आंदोलनस्थळीच स्वयंपाक करून रात्र काढण्याची तयारी त्यांनी केली आहे. दरम्यान, २८ किलोमीटर पाय चालून आलेल्या काही महिला आणि मुलींची प्रकृती खालावल्याने त्यांना वैद्यकीय मदत देण्याची वेळ आली. उपविभागीय पोलीस अधिकारी चांदिवार यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. आजारी आंदोलकांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य केले.
डिसेंबरपर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. मात्र, यापूर्वीही आश्वासनांचेच समाधान मानवे लागल्याची भावना व्यक्त करत नागरिकांनी प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले.













