लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नागपूर येथे महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. शुक्रवार २३ ऑक्टोबर रोजी नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत मतदान होणार आहे. या निवडणुकीत एकूण ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदानासाठी विभागातील सहा जिल्ह्यांत एकूण ४४९ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी मतदान पथके, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसह आवश्यक प्रशासकीय नियोजन पूर्ण करण्यात आले आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतील एकूण २ लाख ५५ हजार ६०३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १ लाख ४० हजार २८० पुरुष, १ लाख ८ हजार ३०१ महिला आणि २२ इतर मतदारांचा समावेश आहे.
मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी, यासाठी नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत मतदान पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागात एकूण २ हजार ५३५ शासकीय अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. ४०६ केंद्र सरकारचे शासकीय अधिकारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यासाठी केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील ३२ अधिकारीही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी विशेष नैमित्तिक रजेची तरतूद करण्यात आली आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदार म्हणून नोंदणी असलेले कर्मचाऱ्यांना नियमानुसार विशेष नैमित्तिक रजा अनुज्ञेय आहे. ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नियमित नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असेल. खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या नोंदणीकृत मतदारांनाही मतदान करता यावे, यासाठी पूर्वी देण्यात येणाऱ्या दोन तासांच्या सवलतोऐवजी चार तासांची विशेष सवलत देण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले आहेत.
२७ ऑक्टोबरला मतमोजणी
मतदानानंतर मंगळवार २७ ऑक्टोबर रोजी नागपूर येथील मानकापूरच्या विभागीय क्रीडा संकुल येथे मतमोजणी करण्यात येणार असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील संबंधित निवडणूक साहित्य वाटप केंद्रावरून मतदान पथके संबंधित मतदान केंद्राकडे सुरखेसह रवाना झाली आहेत. शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणेकडून कडक सुरक्षा व्यवस्था व आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ४४ हजार ४६६ मतदार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात ३२ हजार २६२, गोंदिया जिल्ह्यात २२ हजार १०६, वर्धा जिल्ह्यात २१ हजार ७४२, भंडारा जिल्ह्यात २१ हजार ३४९, तर गडचिरोली जिल्ह्यात १३ हजार ६०८ मतदारांची नोंदणी झाली आहे. मतदान केंद्रांच्या संख्येतेही नागपूर जिल्हा आघाडीवर आहे. नागपूर जिल्ह्यात २७६ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात ५८, वर्धा जिल्ह्यात ४१, गोंदिया जिल्ह्यात ३९, भंडारा जिल्ह्यात ३५ आणि गडचिरोली जिल्ह्यात २७ मतदान केंद्र आहेत.














