३०० ते ४०० मीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, महामार्गावरील खड्ड्यांकडे एनएचएआयचे दुर्लक्ष
लोकवाहिनी न्यूज
धामणा (लिंगा) : नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील गोंडखेरी टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. टोल भरण्यासाठी तब्बल २० मिनिटंपर्यंत वाहनांच्या रांगेत ताटकळत उभे राहावे लागत असून, ३०० ते ४०० मीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लगण्याचें झाले आहे. विशेष म्हणजे, या कोंडीत रुग्णवाहिकाही अडकत असल्याने टोल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यापूर्वी अटलांटा टोल प्लाझा कंपनीकडे असलेला टोल व्यवस्थापनाचा कार्यकाल संपल्यानंतर एनएचएआयने मागील तीन महिन्यांपासून कोरल प्रा. लि. कंपनीकडे टोल व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, व्यवस्थापन बदलले तरी वाहनधारकांची डोकेदुखी कायम आहे. टोलनाक्यावर बारंबार होणाऱ्या किलबिलाबाबत विचारणा केली असता, ‘सिस्टम स्लो आहे’ असे ठरलेले उत्तर टोल प्रशासनाकडून दिले जाते. मग ही यंत्रणा अद्ययावत करण्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल उपस्थित होत आहे.
दुसरोकडे, कच महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. टोलवसूल मात्र नियमित सुरू असताना रस्त्यांची दुरुस्ती कोण करणार? यावरून टोल प्रशासन आणि एनएचएआय एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. खड्डे बुर्जिवणे आमचे काम नसून ती जबाबदारी एनएचएआयची असल्याचे टोल प्रशासन सांगते. एनएचएआयच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता भ्रमणध्वनी नॉट रिचेबल येत आहे. टोलवसुलीसाठी तत्परता, सुविधांच्या बाबतीत उदासीनता, अशी परिस्थिती असताना वाहनधारकांनी दाद मागायची तरी कोणाकडे? टोल प्रशासन आणि एनएचएआयने तातडीने दखल घेऊन वाहतूक कोंडी व महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न निकाली काढावा, अशी वाहनधारकांची मागणी आहे. प्रशासन सुस्त, वाहनधारक त्रस्त अशी अवस्था झाली आहे.















