नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सेवा विभाग आणि डॉ. हेडगेवार स्मारक समिती, नागपूर यांच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या ‘सेवा दिशा-३०’ या सेवा प्रकल्पातील विद्यार्थी व पालकांचे दीपावली स्नेहमिलन नुकतेच आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला संघाचे विदर्भ प्रांत प्रचारक गणेश शेटे आणि डॉ. हेडगेवार स्मारक समितीचे सचिव अभय अग्निहोत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी गणेश शेटे यांनी डॉ. हेडगेवार स्मारक समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची तसेच संघाच्या सेवा विभागाकडून समानासाठी राबविण्यात येणाऱ्या सेवाकार्यांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबतच सामाजिक जीवनातील आपली भूमिका आणि जबाबदारी यांची भान ठेवावे, असे ते म्हणाले.
‘दिशा-३०’ प्रकल्पातील विद्यार्थी सध्या आईआईटी मद्रास, आईआईटी कानपुर, आईआईटी पाटना यांसह देशातील अन्य नामांकित महाविद्यालयंमध्ये शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना विद्यार्थी जीवनातील शिस्त, ध्येयनिष्ठा आणि सामाजिक जीवनातील योगदान यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी सिटी प्रीमियर कॉलेजचे श्रीरंग पेशवे, यतींद्र नाडकर्णी यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
















