लोकवाहिनी न्यूज:धार : मध्य प्रदेशातील धार येथील वादग्रस्त भोजशाळा-कमाल मौला संकुलाबाबत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय देताना मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने हा परिसर हिंदू मंदिर असल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायालयाने मुस्लिम पक्षाचा दावा साफ फेटाळून लावताना, हा परिसर देवी सरस्वतीला समर्पित मंदिर आणि संस्कृत शिक्षणाचे प्राचीन केंद्र असल्याचे नमूद केले.
हिंदू पक्षाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या वैज्ञानिक सर्वेक्षण अहवालावर विश्वास व्यक्त केला. पुरातत्वशास्त्र हे विज्ञान असून, त्यातून समोर आलेल्या निष्कर्षावर न्यायालय अवलंबून राहू शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाने हिंदू समाजाच्या दोन जनहित याचिका मंजूर करताना भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने (एएसआय) ७ एप्रिल २००३ रोजी दिलेला आदेशही रद्द केला आहे. या आदेशानुसार मुस्लिमांना प्रत्येक शुक्रवारी येथे नमाज अदा करण्याची परवानगी होती. इंदूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विजय कुमार शुक्ला आणि न्यायमूर्ती आलोक अवस्थी यांनी हा निर्णय दिला.









