नोकरीचे आमिष, अश्लील व्हिडियो कॉल अन् ब्लॅकमेलिंग
नागपूर : चांगली नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीला जाळ्यात ओढले. त्यानंतर अश्लील व्हिडियो कॉलच्या आधारे ब्लॅकमेल करून तिच्याकडून तीन लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या या तरुणीचे व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आणखी १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. याप्रकरणी तहसील पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरु केला आहे.
नागपुरातील ही तरुणी गेल्या काही वर्षांपासून मनोरंजनासाठी आणि विविध कामांसाठी सोशल मीडियावरील वेबसाइटचा वापर करत होती. याच माध्यमातून तिची आरोपीशी ओळख झाली. मुख्य आरोपी इरफान अली याने स्वतःला मोठा व्यापारी आणि उत्तर प्रदेशातील एका राजकीय संघटनेचा नेता असल्याचे सांगितले.
इरफान याने तरुणीला चांगली नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले, या विश्वासातून तिच्याकडून वैयक्तिक आणि इतर आवश्यक कागदपत्रे मिळवली. त्यानंतर त्याने तरुणीला व्हिडियो कॉलदरम्यान अश्लील संभाषण करण्यास प्रवृत्त केले, याच वेळी तिच्या व्हिडियो कॉलचे रेकॉर्डिंग करण्यात आले. नंतर या रेकॉर्डिंगचा वापर करून इरफानने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
व्हिडियो व्हायरल करण्याची धमकी देत तिला १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. बदनामीच्या भीतीने तरुणीने तीन लाख रुपये इरफानला दिले. मात्र, पैसे दिल्यानंतरही धमक्या थांबल्या नाहीत. त्यामुळे तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
या प्रकरणात मोहाली, चंदीगड, गोवा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश येथील अनेक व्यक्तींची नावे समोर येत आहेत. किरण मित्तल, पायल डेस्टीनी, इरफान अली, वीरेंद्र राणा आणि नितीन जैन यांच्यासह अन्य व्यक्तींचा सहभाग यात असावा, असा पोलिसांना संशय आहे. तरुणींना फसवणारे हे रॅकेट आहे का? याचा शोधही घेतला जात आहे.














