भोपाळमधून मुख्य आरोपीसह चार तरुणी ताब्यात
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : ‘दैनिक श्रेष्ठ न्यूज’साठी जाहिरात द्या, अथवा वार्षिक वर्गणीदार व्हा, अन्यथा विरोधात वृत्त प्रकाशित करू अशी भीती दाखवत महिला सरपंचांना दूरध्वनीवरून खंडणी मागणाऱ्या चार महिलांच्या टोळीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी भोपाळ येथून अटक केली. धक्कादायक म्हणजे या टोळीने खंडणीचे दूरध्वनी करण्यासाठी भोपाळमध्ये तीन कॉल सेंटर्सवर ३५ मुलींची नियुक्ती केली होती. या मुली देशातील ८ राज्यांमधील ६१८ सरपंच आणि ग्रामसेवकांचे भ्रमणध्वनी क्रमांक मिळवून नियोजनबद्ध पद्धतीने धमकावून खंडणी मागt होत्या.
पैसे न दिल्यास ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार उघड करून बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्याची धमकी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी नरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मोनिका लालसिंग सूर्यवंशी (२८), नेहा लालसिंग सूर्यवंशी (२३), अक्षरा मिलिंद अर्क (२१) आणि कोमल मोहन मोरे (२३) या चार जणींना अटक केली. यातील मोनिका ही मुख्य आरोपी आहे. भिवांड येथील सरपंच मीना सुरेशसिंग सूर्यवंशी (४०) यांनी याबाबत तक्रार दिली होती. त्यांना ११ ऑगस्ट ते ६ नोव्हेंबर या कालावधीत अनोळखी महिलेने दैनिक श्रेष्ठ न्यूजमधून बोलत असल्याचे सांगून स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छांची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी तीन हजार रुपयांची मागणी केली होती. त्यासाठी क्यूआर कोडही पाठवला. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर बदनामीची धमकी देण्यात आली. जुनोना फुके येथील सरपंच प्रभा ओमप्रकाश गोतमारेंकडून दिशाभूल करून पाचशे रुपये ऑनलाइन स्वीकारण्यात आले.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना भोपाळमध्ये नगर, निशातुपुरा आणि एमपी-१ नगर येथे तीन ठिकाणी बेकायदेशीर कॉल सेंटर सुरू असल्याचे आढळले. तिथे एकूण ३५ तरुणी वेतनावर काम करत होत्या. त्यांना सरपंच आणि ग्रामसेवकांना संपर्क साधण्याचे काम देण्यात आले होते. महापंचायत पोर्टलचा वापर करून उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या आठ राज्यांमधील सरपंच व ग्रामसेवकांचे संपर्क क्रमांक असलेली ६१८ जणांची यादी तयार करण्यात आली होती. संबंधित राज्यांच्या भाषेचे ज्ञान असलेल्या तरुणीमार्फत फोन करून जाहिरातीच्या नावाखाली पैसे मागितले जात होते. पैसे न दिल्यास ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार प्रसिद्ध करण्याची धमकी दिली जात होती.
या टोळीची सूत्रधार मोनिका सूर्यवंशी हिने दोन वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील रुद्राक्ष न्यूज वाहिनीवर काम केले होते. तेथून तिने न्यूज वाहिनी सुरू करून खंडणी उकळता येऊ शकते, ही संकल्पना चोरली. त्या आधारे या चौथींनी श्रेष्ठ न्यूज नावाने वृत्त वाहिनीची नोंदणी केली.
असा झाला पर्दाफाश
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ नोव्हेंबरला लोहारी सावंगा येथे महिला सरपंच सभा घेतली होती. तिथे सरपंच मिना सूर्यवंशी, प्रभा गोतमारें, मंगला कोर्डे, लता बागाडे, गौतम शेंडे and नासिर शेख या सरपंचांनी मुख्यमंत्र्यांकडे खंडणीसाठी श्रेष्ठ न्यूज चॅनेलच्या नावाने धमकी मिळत असल्यारचे गाऱ्हाणे मांडले होते. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तत्काल जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना निर्देश दिले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी याची नरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या टोळीचा उलगडा झाला.















