वडोदरा येथे विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी
लोकवाहिनी न्यूज
वडोदरा : भारताला कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात jagatik महासत्ता बनायचे असेल, तर देशात मजबूत एआय परिसरं निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. एआयमध्ये कुशल तरुणांची गरज केवळ माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रापुरती मर्यादित नसून कृषी, आरोग्यसेवा, उत्पादन, रोबोटिक्स यासह प्रत्येक क्षेत्रात एआयच्या माध्यमातून नवीन उपाय आणि रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
गुजरात मधील वडोदरा येथे आयोजित ‘नमो फॉर विकसित भारत’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल ३५,००० कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी त्यांनी २८०० किलोमीटर लांबीच्या ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’चे काम पूर्ण झाल्याची ऐतिहासिक घोषणा केली. तसेच जेन-झी ना संबोधित करत विरोधकांवर थेट हल्ला चढवला.
विरोधी पक्षांवर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, तरुणांनो ऐका, २०१४ पूर्वीच्या ७-८वर्षात १ किलोमीटर फ्रेट कॉरिडॉरचे कामही पूर्ण होऊ शकले नाही. त्यांच्या हिशोबाने देश चालवला असता तर तुमच्या पुढील ३-४ पिढ्या आल्या असत्या, तरीही हे काम झाले नसते. आता ते नाराज फूफाजी पुन्हा ओरडतील, ट्रूकवाल्यांचे काय होणार ? ट्रक कुठे जाणार? मात्र आता फूफाजींना काम मिळाले. आज मोठ्या प्रमाणावर माल देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वेगाने पोहोचू शकेल.
पंतप्रधान म्हणाले, २००४ मध्ये या प्रोजेक्टचा विचार झाला आणि २००६ मध्ये कंपनी स्थापन झाली, पण २०१४ पर्यंत केवळ फायली एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फिरत राहिल्या. २०१४ मध्ये देशातील जनतेने मला गुजरातवरून दिल्लीत पाठवले यानंतर या कामाला गती मिळाली. आज देशात २,८०० किमीचा फ्रेट कॉरिडॉर पूर्ण झाला असून, यामुळे देशभरात मालवाहतूक अधिक वेगाने आणि स्वस्त दरात होणार आहे. एवढेच नाही तर, मालवाहतूक कॉरिडॉरमुळे भारतीय रेल्वे आता अशा ठिकाणी पोहोचत आहे, जेथे दशकापासून पोहोचता आले नव्हते.
२,८०० कि.मी. फ्रेट कॉरिडॉरचे काम पूर्ण
विकसित भारतासाठी वेगवान आणि सुलभ कनेक्सिव्हिटी आवश्यक असल्याचे मोदी यांनी सांगितले. वडोदरा हे शिक्षण आणि उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र असून येथे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे अंतिम दुवे जोडण्यात आले आहेत. देशात २,८०० किलोमीटरपेक्षा अधिक डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे काम पूर्ण होणे ही २१व्या शतकातील भारतासाठी ऐतिहासिक उपलब्धी असल्याचे त्यांनी म्हटले. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरची संकल्पना २००४ मध्ये मांडण्यात आली आणि २००६ मध्ये त्यासाठी विशेष कंपनी स्थापन करण्यात आली. मात्र २०१४ पर्यंत हा प्रकल्प कागदोपत्रीच राहिला, अशी टीका मोदी यांनी मागील सरकारवर केली. “फायली एका ठिकाणााहून दुसऱ्या ठिकाणी फिरत राहिल्या; त्या फायलींनाही समर्पित कॉरिडॉर मिळाला नाही,” असा उपरोधिक टोला त्यांनी लावला. २०१४ नंतर केंद्र सरकारने या प्रकल्पाला गती दिली आणि आज २,८०० किलोमीटरहून अधिक काम पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील पंतप्रधानांच्या कार्यक्रमस्थळावरून संशयित ताब्यात
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ (एनएमसीसी) परिसरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सायंकाळी होणाऱ्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेचा गंभीर प्रकार समोर आला. कार्यक्रमाच्या आवाारातून मुंबई पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यातील एका तरुणाकडे बनावट पंतप्रधान कार्यालयाचे (पीएमओ) ओळखपत्र आढळले. विशेष म्हणजे, हा तरुण स्वतःला पीएमओचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगत होता. त्याच्यासोबत असलेल्या खासगी बॉडीगार्डकडे बंदूक आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी एनएमसीसी परिसरातून रोहन पारेख या २४ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. पारेख हा कार्यक्रमस्थळी अत्यंत रुबाबात वावरत होता.











