लोकवाहिनी न्यूज
नागपूर : विश्व हिंदू परिषद (विहिंप) स्थापना दिनानिमित्त नागपुरात आयोजित शोभायात्रेदरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शोभाяत्रेत साकारण्यात आलेल्या झांकीमुळे सामाजिक तेढ निर्माण होत असल्याचा ठपका ठेवत संबंधित कारागिराला पोलिसांनी नोटीस बजावल्याचा आरोप विहिंपने केला आहे. या प्रकाराबाबत पोलिस प्रशासनाने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विहिंपने दिला.
नागपुरातील सीताबर्डी आणि गणेशपेठ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून ही शोभायात्रा काढण्यात आली. या झांकीवरून सीताबर्डी पोलिसांनी शोभायात्रेवर गुन्हा दाखल केल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे. सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बर्डे मेन रोडवर अन्नपूर्णा सिंह यांनी उपस्थित राहून मोबाईलवर डीजेचा डेसिबल तपासला. त्यानंतर शोभायात्रा थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे विहिंपचे म्हणणे आहे.
डीजेचा आवाज मर्यादित ठेवूनही कार्यकर्त्यांशी धक्काबुक्की करण्यात आली आणि त्यांना धमकी देण्यात आल्याचा विहिंपने केला आहे. त्यामुळे पोलिस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शोभायात्रेला व त्यातील झांकीना लक्ष्य करीत असल्याचा संताप विहिंपचे विदर्भ प्रांत प्रचार-प्रसार प्रमुख निरंजन सिसोदिया यांनी केला.
विहिंपचे प्रांत उपाध्यक्ष डॉ. हेमंत जांभेकर, प्रांत मंत्री प्रशांत तितरे, प्रचार प्रमुख निरंजन सिसोदिया, महानगर अध्यक्ष राजू पदनाकर, नीलकांत गुप्ता, बजरंग दल नागपूर महानगर संयोजक शुभम अरेले यांनी पत्रकार परिषदेत घेत पोलिसांच्या या कारवाईचा निषेध व्यक्त केला.












