रितेश देशमुख अभिनेत आणि दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन चार आठवडे पूर्ण होत आले असले, तरी प्रेक्षकांमधील या सिनेमाची क्रेझ अजूनही कायम आहे. महाराष्ट्रात तर या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत असून अनेक थिएटरमध्ये अजूनही हाऊसफुल्ल गर्दी पाहायला मिळत आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने सुरुवातीपासून प्रेक्षकांची मने जिंकली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कथा आणि भव्यदिव्य सादरीकरणामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. रितेश देशमुखने केवळ अभिनयच नाही, तर दिग्दर्शनाची धुराही सांभाळली असून त्याच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याशिवाय बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान, नवीन चित्रपट रिलीज होत असतानाही ‘राजा शिवाजी’ची कमाई थांबलेली नाही.
चौथ्या आठवड्यात प्रवेश केल्यानंतरही हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरकडे खेचत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने २७ व्या दिवशी तब्बल ४० लाख रुपयांची कमाई केली आहे. कमाईबाबत बोलायचे झाल्यास, पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने ५२.६५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. दुसऱ्या आठवड्यात २४ कोटी रुपयांची कमाई झाली, तर तिसऱ्या आठवड्यात १२ कोटी रुपये कमावले. अशाप्रकारे २७ दिवसांत ‘राजा शिवाजी’ने भारतात एकूण ९३.३० कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. फक्त भारतातच नाही, तर परदेशातही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ओव्हरसीज मार्केटमध्ये चित्रपटाने ४.२२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे जगभरातील एकूण कमाईचा आकडा आता ११४.४९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, मराठी सिनेमांसाठी हा मोठा विक्रम मानला जात आहे. ऐतिहासिक विषय, दमदार अभिनय आणि भव्य सादरीकरणामुळे ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून आगामी दिवसांतही हा सिनेमा आणखी मोठी कमाई करेल, अशी चर्चा सुरू आहे.










